Nashik Atul Save : नाशिकमधील (Nashik) सावकारी जाचाला आळा बसवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेश सहकारमंत्री अतुल सावे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार आता नाशिकमधील सावकारांना लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पथक काम करणार असून त्याद्वारे खासगी सावकारीचा बिमोड केला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात खासगी सावकाराच्या (Illegal moneylenders) जाचाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे अनेकजण त्रस्त असून आता तक्रारदार पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सहकारी मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी नाशिकला भेट देत आढावा बैठक घेतली. त्यानुसार नाशिकमधील खासगी सावकारी प्रकरणाचा आढावा घेत त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आणि सहकार विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. याचबरोबर नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या (Nashik Collector) अध्यक्षतेखालील या तिन्ही विभागाचे पथक काम करतील, अशा सूचना राज्याचे मंत्री सावे यांनी दिल्या आहेत.
यावेळी अतुल सावे म्हणाले कि, खासगी सावकारीला आळा घातलाच पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी करताना तक्रारदार खरी माहिती देत नाहीत, त्यामुळे अनेक अडचणी येतात. तर नाशिक जिल्हा बँकेच्या थकीत कर्ज वसुली संदर्भात ते म्हणाले की, आम्ही प्रशासकांना सांगितलं आहे की, मोठे कर्जदार आहेत त्यांच्यावर आधी अॅक्शन घ्यावी. त्यांच्याकडून आधी वसुली करावी. कारण जिल्हा बँक अडचणीत आहे. वसुली नाही झाली तर या बँकेचे लायसन्स कॅन्सल होऊ शकते. छोट्या कर्जदारांना पण थोडासा वेळ देऊन, त्यांना व्याजात काही सूट देता येईल का, हे पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. यावर शासनस्तरावर एक बैठक होईल. यात कुणाचीही गय केली जाणार नाही. कुणालाही अभय दिले जाणार नाही. कुणीही असो कारवाई केली जाईल.
भाजप जिल्हाध्यक्षांची शिफारस आवश्यक...
सहकार संस्थांची नोंदणी करतांना भाजप जिल्हाध्यक्षांची परवानगी घ्यावी लागणार का? या प्रश्नावर सहकारमंत्री अतुल सावे काहीसे संतापले, आणि त्यांनी या विषयावर अजब उत्तर दिले आहे. सावे म्हणाले, नवीन संस्था नोंदणी करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांची शिफारस असणे आवश्यक आहे. ते याचसाठी की अशा संस्थांची पडताळणी करून त्या मंजूर करता येतील. कायद्यात बसून सगळ्या गोष्टी होतील. भाजप जिल्हाध्यक्ष पडताळणी करून आमच्याकडे पाठवतील. अशा नवीन नोंदणी होणाऱ्या संस्थांची पडताळणी कुणीतरी करायला हवी, सोसायटी आहे की नाही. अधिकाऱ्यांकडून आल्यानंतर जिल्हाध्यक्ष माझ्याकडे पाठवेल. या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुणीतरी हवं, असे मत सावे यांनी व्यक्त केले.
तक्रार द्यायला पुढे यावं, असं आवाहन...
नाशिक शहरात सध्या अवैध सावकारीला ऊत आला आहे. सावकारी जाचाला कंटाळून गेल्या सात दिवसात चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात गेल्या वर्षी 273 अधिकृत सावकारांची नोंद त्यांच्याकडे झाली असून अवैध सावकारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते आहे. नागरिकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये आणि न घाबरता तक्रार देण्यास पुढे यावं असं आवाहन त्यांच्याकडून केलं जात आहे. नाशिक जिल्हा गेल्या वर्षात जवळपास 95 तक्रारी आपल्याकडे आल्या. त्यातील 22 ठिकाणी आपण छापे टाकत कारवाया केल्या. नागरिकांनी टोकाचे पाऊल उचलू नये तक्रार द्यायला पुढे यावं, असं आवाहन नाशिक जिल्हा सावकार निबंधक सतीश खरे यांनी केले आहे.