Nashik News : नाशिक (Nashik) शहर आयुक्तालयातील पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मात्र या घटनेननंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाच्या कुटुंबात आत्महत्येची ही चौथी घटना असल्याचे समोर आल्याने चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान या आत्महत्येचे कारण समजु शकलेले नाही. मात्र एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी वेगवगेळ्या महिन्यात स्वतःला संपवल्याने नेमके घटनेमागे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


दरम्यान मागील तीन दिवसांपूर्वी शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) सहाय्यक उपनिरीक्षकाने आत्महत्या (Suicide) केली होती. त्यांनतर शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या चालक पोलीस शिपायाने मोटार परिवहन विभागाच्या पार्किंगमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील तोरंगण येथील रहिवासी असलेले आणि सध्यस्थितीत नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले मोहन लक्ष्मण बोरसे असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. बोरसे सन 2006 मध्ये मुंबईत पोलीस दलात चालक म्हणून रुजू झाले होते. सन 2020 मध्ये त्यांची बदली नाशिक शहरातील मोटार परिवहन विभागात झाली. 


गुरुवारच्या दिवशी बोरसे यांची ड्युटी पोलीस मुख्यालयातून गस्ती पथकाच्या मोबाईल वाहनावर चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी रात्री नऊनंतर कर्तव्य बजावल्यानंतर ते मोबाईल वाहन पुन्हा मोटार परिवहन विभागात पार्क करण्यासाठी पहाटे गेले. त्यानंतर त्यांनी ताब्यातील मोबाईल वाहन दुसऱ्या ठिकाणी पार करत मोटर परिवहन विभागातील विभागातील एका दुरुस्तीच्या वाहनावर चढून पत्र्याच्या शेडमधील अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतला. पहाटे 4 ते सकाळी 6 यादरम्यान आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. सकाळच्या सुमारास काही अंमलदार मोटार परिवहन आले असता त्यांना बोरसे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती तात्काळ सरकार वाडा पोलिसांना कळवली.  त्यानुसार सहाय्यक निरीक्षक पाटील यांच्यासह पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. दरम्यान मृत बोरसे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असा परिवार आहे. या पोलीस शिपायाच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 


एकाच कुटुंबातील चौथी आत्महत्या


दरम्यान मोहन बोरसे यांच्या आत्मम्हत्येनंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहन बोरसे यांचे वडील लक्ष्मण यांनीही काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली असून, त्यांच्या भावानेही आत्महत्या केली आहे. त्यांच्या पुतण्यानेही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. एकाच कुटुंबात वेगवेगळ्या महिन्यांत चार आत्महत्या घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आत्महत्यांचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र अशा पद्धतीने एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याने चर्चाना उधाण आले आहे.