DG Mahesh Bhagwat : संघर्षाच्या काळावर मात करून पुढे जायचे असते. त्यामध्ये काही शॉर्टकट नसतो, या काळात जे मार्गदर्शक भेटतात, ते शेवटपर्यंत सोबत असतात. त्यामुळे यश गवसल्यानंतर एक भावना निर्माण झाली, आपल्याला समजाला काहीतरी देणं आहे, याच भावनेतून 2014 पासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आतापर्यंत दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत पोहचवण्याचे काम अतिरिक्त डीजी महेश भागवत यांच्यासह त्यांच्या टीमने केले आहे.
आज नाशिकमध्ये (Nashik) वसंत व्याख्यानमालेच्या (Vasant Vyakhyanmala) निमित्ताने तेलंगणामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, सीआयडी प्रमुख म्हणून कार्यरत महेश भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला जीवनपट उलगडत विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यानुसार महेश भागवत हे मूळचे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहेत. दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद आणि स्थानिक माध्यमिक विद्यालयात झाले.. अकरावी बारावी एसपी कॉलेज पुणे, त्यानंतर 1990 साली पुण्यातून बीई सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा पास झाले. त्यांनतर पुण्यातच काही वर्ष खासगी संस्थेत नोकरी केली. 95 साली भारतीय पोलीस सेवेत निवड झाली. सुरवातीचे दोन वर्ष मणिपूर राज्यात काम केले. 1999 ते 2014 पर्यत आंध्रप्रदेश राज्यात काम केले, 2014 पासून आतापर्यंत तेलंगणा राज्यात काम करतो आहे.
महेश भागवत (Mahesh Bhagwat) हे सध्या 9 जानेवारी 2023 पासून अतिरिक्त DG CID तेलंगणा राज्य म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रचकोंडा आयुक्तालयात पोलिस आयुक्त होते. रचकोंडा येथेच त्यांनी इतरांना मदत करण्याचा विलक्षण प्रयत्न सुरू केला. भागवतांसाठी आयपीएस अधिकारी बनणे हे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यांच्यासारखी स्वप्ने पहाणार्या, इच्छुकांना भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करण्यास, महेश भागवत, आयपीएस, पोलिस आयुक्त, रचकोंडा, यांनी सुरुवात केली, तीही विनामूल्य. त्यांच्या स्वत:च्या प्रवासामुळे त्यांना परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या संघर्षाचीही जाणीव झाली. इतरांना सोपे जावे म्हणून भागवत यांनी इतर अधिकाऱ्यांसमवेत मुलाखतीच्या फेरीसाठी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
दोन हजार यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण
दरम्यान व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत, या मंडळींनी 2 हजार यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे. गेल्या वर्षी नागरी सेवा परीक्षेत भागवत आणि टीमच्या मार्गदर्शनाखाली 100 उमेदवारांनी मुलाखती क्रॅक केल्या असून त्यांच्या कार्यालयात स्थानिक उमेदवारांना मार्गदर्शन करतात. ऑनलाइन गटांमुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि अंतर्गत महसूल सेवा (IRS) मधील अधिकारी असलेल्या या अनुभवी मार्गदर्शकांकडून प्रशिक्षणाचा लाभ घेणे शक्य झाले आहे. नागरी सेवांव्यतिरिक्त, ही टीम, भारतीय वन सेवा (IFS) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) परीक्षांसाठी इच्छुकांना मार्गदर्शन करते.
तेव्हा आणि आताच्या स्पर्धा परीक्षा बद्दल...
दरम्यान 1995 चा स्पर्धा परीक्षांचा काळ आणि आत्ताचा परीक्षांचा काळ यावर बोलताना ते म्हणाले, की दिल्लीला मिळायची आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव म्हणजे मुंबईला राज्य प्रशासकीय शिक्षण ट्रेनिंग सेंटर ही महाराष्ट्राची संस्था होती. जिथे सीईटी देऊन प्रवेश घेतला. मग तिथे अभ्यास केला आणि नंतर यशस्वी झालो. आता आम्ही जेव्हा बघतो, तर दिल्लीला खूप क्लासेस आहेत, पण पुणे हे दिल्ली खालोखाल दुसरे सेंटर आहे. यूपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थी तयारी करतात. त्यांना अभ्यासाचे भरपूर साहित्य उपलब्ध झालेले आहे. रेडिमेट मटेरियल युट्युबसह नेटवर उपलब्ध असून त्यामुळे विद्यार्थ्यांना काय करायचं आणि काही नाही करायचं प्रश्न पडलेला असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे सोपे झाले आहे. आम्ही ज्यावेळी परीक्षांची तयारी करत होतो, त्यावेळी आमच्याकडे खूप कमी पर्याय होते. 90 साली सिविल इंजीनियरिंग पास झालो. त्यावेळी झिरो बजेट होतं. शासनाकडून नोकऱ्या नव्हत्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने यूपीएससीकडे वळालो. मात्र त्यावेळच्या परिस्थितीच्या तुलनेत आज अनेक नोकऱ्या आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचे दालन हे सगळ्यांसाठी खुलं आहे.