Jalgaon News : खरीप हंगामाच्या (Kharip Season) पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग सुरु असून या दरम्यान बोगस बियाणांच्या (Fraud fertilizers) माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार समोर येत असतात. त्यामुळे कृषी विभागाकडून नेहमीच जनजागृती केली जाते. मात्र तरीदेखील बोगस बी बियाणे विक्री करणारी टोळी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. 


सद्यस्थितीत शेतकऱ्यांची खरीप लागवडीची तयारी सुरु असून याच सुमारास बी बियाणे, खते यांची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यास सुरवात होते. मात्र अशावेळी बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले जाते. याच पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) विभागाच्या माध्यमातून धडक कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विनापरवाना व अनधिकृत गोडावूनमधून रासायनिक खत व सेंद्रीय खताची गावेगावी, घरोघरी बिगर बिलाने विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ आणि जळगांव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळयाचे नियोजन करण्यात आले.
  
त्यानुसार जळगांवचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी पाचोरा येथे येऊन पाचोरा (Pachora) येथील उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, कृषि अधिकारी, पंचायत समिती, कृषि पर्यवेक्षक अविनाश चंदीले यांना सोबत घेऊन पाचोरा तालुक्यातील जारगांव येथील मधुकर शंकर भोकरे यांच्या मालकीच्या गोडावूनची तपासणी केली. यावेळी पथकाला विनापरवाना अनधिकृत खत साठा आढळून आला. याबाबत गोडावून मालकाची विचारपूस केली असता हे गोडावून काही दिवसांपुर्वी दिपचंद्र श्रीवास यांना भाडयाने दिल्याचे सांगीतले. या विनापरवाना व अनधिकृत खत साठयाबाबत दिपचंद्र श्रीवास यांना मोबाईलद्वारे संपर्क साधुन गोडावून व कंपनीचा परवाना मागीतला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 


दरम्यान सदर पथकाने गोडावुनची झाडाझडती घेतली असता या गोडावूनमध्ये रुपये 2 लाख 38 हजार 629 किमतीचा 6.78 मेट्रिक टन खत साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करु नये. तसेच अशा कृषि निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यांचे मोबाईल 8983839468 आणि दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर माहिती द्यावी. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.