Nashik News : नाशिक (Nashik0 शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असेलला काजी गढीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून पावसाळयाच्या तोंडावर पुन्हा एकदा काजी गढीचा प्रश्न पुढे आला आहे. मनपा प्रशासन आता काय उपाययोजना करणार याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 


नाशिकच्या गंगाघाटाच्या (Gangaghat) परिसरात असलेल्या काजीगढीचा प्रश्न काही नवीन नाही. मागील सुमारे 25 वर्षापासून हा वाद सुरू आहे. अनेक वेळा याबाबत निर्णय होऊन देखील प्रत्यक्षात काम झालेले नाही. काजीगढीवर सुमारे 100 पेक्षा जास्त घरे असुन हे कुटुंब आपले जीव मुठीत घेऊन राहत आहे. त्यांची एकच मागणी आहे, ती म्हणजे संरक्षण भिंत बांधण्यात यावी, जेणेकरून ती ढासळण्याची शक्यता राहणार नाही. मात्र प्रशासन याकडे सतत दुर्लक्ष करीत आले आहे. मध्यंतरी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते शाहू खैरे यांच्या पुढाकाराने संरक्षण भिंतीसाठी सुमारे चार कोटी रुपये मंजूर देखील झाले होते, यामुळे लवकरच भिंत उभारण्यात येईल, अशी आशा व्यक्त होत असताना तो ठरावच गायब झाल्याची चर्चा सध्या नाशिकरांमध्ये आहे. 


सध्या पावसाचे दिवस असून राज्यातील अनेक भागात काजीगढी सारखी ठिकाणे आहेत. तर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मात्र गेल्या २५ वर्षांपासून सुरु असेलला वाद अद्यापही कायम आहे. फक्त पावसाळ्याच्या तोंडावर मनपा प्रशासनाला जाग येते. आणि त्यांनतर तात्पुरती उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. मात्र आजही हि काजी गढी बघितली तर मनात धस्स होत. इथले रहिवासी आजही जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत असल्याचे सर्व परिचित आहे. मग प्रशासन नेमकी कुणाची वाट बघतेय, हा प्रश्नही या निमित्ताने उभा राहिला आहे. 


काजी गढीला नोटीस 
दरम्यान यापूर्वी राज्य शासनाच्या मेरी संस्थेद्वारे देखील काजीगढी येथील मातीची चाचणी झाली आहे. मात्र त्याचा अहवाल देखील अद्याप गुलदस्त्यातच आहे. गत काही वर्षांमध्ये गढीवरील माती घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे पुन्हा धोका वाढला आहे. नाशिक महापालिका प्रशासनाने काजीगढीसह शहरातील सुमारे एकूण 1117 धोकादायक इमारतींना नोटिसा बजावले आहे. तसेच दोन नोटीस झाल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांच्या मार्फत कारवाई होणार आहे. यामुळे आगामी काळात काजीगढीवासी तसेच प्रशासनात संघर्ष वाढणार आहे. तरी लोकप्रतिनिधी यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा गंभीर प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.


जीव मुठीत घेऊन वावर
गेल्या अनेक वर्षांपासून काजीगढीचा प्रश्न जैसे थे आहे. इथे हजारो नाशिककर वास्तव्य करतात. दरवर्षी प्रशासन पावसाळ्याच्या तोंडावर काजी गढीवर राहणाऱ्या नागरिकांना नोटीस देते. मात्र येथील रहिवासी 'हे सोडून कुठं जाणार' या आशेने काजी गढीवर जीव मुठीत घेऊन वास्तव्य करतात. गेल्या काही वर्षात काजी गढीवरील माती ढासळत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र इथल्या रहिवासी आजही आपला जीव मुठीत घेऊन वावरत असल्याचे चित्र आहे.