Nashik Shodhini : शाळेच्या वाटेवर, पाण्याला जाताना होणारी छेडछाड, कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता, स्वतःच्या घरात होणारी हिंसा यासारख्या असंख्य हिंसाचाराच्या (Violence) घटनांना समाजातील मुली आजही बळी पडत आहेत.  यानुसार 58 टक्के मुली घराबाहेर फिरू शकत नाही, 13 टक्के मुली म्हणतात छेडछाडीच्या घटनांचा दोष मुलींनाच दिला जातो, याचबरोबर हिंसाचाराचे अनेक छुपे प्रकार असल्याचे धक्कादायक निष्कर्ष नाशिकच्या (Nashik) शोधिनींनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहेत.


आजही समाजात मुलींबाबत (Gilr Violence) होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे. दररोज कुठेना कुठे विनयभंग, अत्याचार, छेडछाड हे प्रकार नित्याचे झाले आहेत. याचा पार्श्वभूमीवर नाशिक येथील अभिव्यक्ती संस्थेच्या माध्यमातून शोधिनी (Shodhini) हा प्रकल्प राबविला जातो. यामध्ये नाशिक शहरातील ग्रामीण भागातील मुलींनी शोधिनी प्रकल्पात सहभागी होत हा संशोधन प्रकल्प समाजापुढे ठेवला आहे. अभिव्यक्ति संस्थेच्या शोधिनी या कृती संशोधन प्रकल्पांतर्गत गेल्या पाच वर्षांत ग्रामीण आदिवासी मुलींनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा अभ्यास करून त्यांचं शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि लग्न या महत्त्वाच्या प्रश्नांवर संशोधन केले आहे. या संशोधनातून विचार करायला लावणारे निष्कर्ष समोर आले आहेत. या निष्कर्षांवर चर्चा करण्यासाठी आणि शोधिनीच्या मागण्यांचा जाहिरनामा प्रस्तुत करण्यासाठी  "वाटचाल हिंसामुक्त भविष्याकडे" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


दरम्यान शोधिनींनी केलेल्या संशोधनातून आलेला जाहिरनामा त्यांच्या हिंसामुक्त, स्वतंत्र भविष्यासाठी कशाची गरज आहे हे सांगतो. तर बालविवाह थांबावेत, मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं. स्वतःच्या पायावर उभं रहावं म्हणून त्यांनी पालकांना प्रोत्साहित केलं आहे. आणि याच माध्यमातून या शोधिनींनी संशोधन सुरु केले. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावपाड्याना भेटी देत आपल्याच सारख्याच शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेर पडावं म्हणून धडपड करणाऱ्या, काही कमी वयात लग्न झालेल्या मैत्रिणींशी त्यांनी संवाद साधला. त्या माध्यमातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले. या निष्कर्षांचा उहापोह करण्यासाठी वाटचाल हिंसामुक्त भविष्याकडे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 


मासिक पाळी स्वच्छता, सुविधा गावात पोहचत नाहीत ही सुद्धा एक प्रकारची आरोग्यावरची हिंसा आहे. समाज माध्यमातून, चित्रपटातून गाण्यांमधून ही दृष्टी कशी पसरवली जाते, यावर भाष्य केले. आपण सजग राहिलं पाहिजे आणि आपल्या वागण्याचा एखाद्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, यावर विचार करायला हवा असं त्या म्हणाल्या. शोधिनीच्या संशोधना विषयी बोलताना प्रणिताने शाळेच्या वाटेवर, पाण्याला जाताना होणारी छेडछाड, तसेच हिंसेचे छुपे प्रकार काय असतात याविषयी सांगितले. मुली हे घरी का सांगत नाहीत यामागे मोठं कारण अशतं ते सगळा दोष मुलींनाच दिला जातो हा आहे. आणि बऱ्याचदा काहीच चुक नसताना शिक्षण थांबवून त्यांचं लग्न लावून दिलं जातं. मग लग्न हेच मुलींच्या आयुष्यातलं अंतिम ध्येय असतं का? मुलींच्या इच्छा, स्वप्न मारणे म्हणजे सुद्धा हिंसाच आहे आणि मुलं जी बदल घडवू पाहतायत ती पण समाजरचनेची बळी आहेत, अशा महत्त्वाच्या मुद्दे या संशोधनातून समोर आले आहेत. 


संशोधनातून नेमके निष्कर्ष काय? 
अभिव्यक्तीच्या माध्यमातून शोधिनींनी नाशिक जिल्ह्यातील मुलींचा समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार त्यांनी अहवाल सादर केला. या संशोधनातून छेडछाडीच्या प्रसंगामुळे 27 टक्के मुलींची शाळा बंद होते. तर 19 टक्के मुलींना नोकरी व्यवसाय करता येत नाही. आणि त्यामुळे 12 टक्के मुलींचे लग्न लावून दिले जाते. 47 टक्के मुलींना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटत नाही. 13 टक्के मुली म्हणतात छेडछाडीच्या घटनांचा दोष मुलींनाच दिला जातो, या भीतीमुळे मग मुली अशा घटना घरी सांगत नाहीत. 58 टक्के मुली घराबाहेर फिरू शकत नाहीत. 76 टक्के मुलींनी आपल्या गावात इतर मुलीसोबत हिंसा होताना पाहिली आहे. 28 टक्के मुलींनी आपल्या घरात हिंसा अनुभवली आहे. 72 टक्के मुलींना लग्नानंतर त्यांची स्वप्ने पूर्ण करता आली नाहीत. 43 टक्के मुली घरात होणाऱ्या हिंसेचा प्रतिकार करू शकत नाही. 28 टक्के मुलींना 15 -16व्य वर्षीच स्थळ बघायला सुरवात होते. लग्न झालेल्या मुलींपैकी 41 टक्के मुलींना इच्छा नसताना लग्न कराव लागलं.