Nashik News : तुम्ही शिवसैनिकांना ओळखत नाहीत, तुम्ही शनिवार, रविवार फक्त हिशोब घ्यायला येतात. आत्तापर्यंत तुम्ही तेच केले यायचं हिशोब घ्यायचा आणि पैसे घेऊन परत जायचं असा गंभीर आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने (shinde Sena) पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत चांगला समाचार घेतला आहे. 


शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा नुकताच नाशिक (Nashik) दौरा झाला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा शहरात येऊन शिंदे गटाला व नव्यानेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. संजय राऊत नाशिकला येण्यापूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झाली होती. त्यामुळे संजय राऊत त्यांनी नाशकात येताच शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल करत जहरी टीका केली होती. 'येडे गबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून प्रवेश करतात', नाशिकमध्ये शिवसेना जशी तशी आहे, दोन-चार ठेकेदार तिकडे गेले असतील, मात्र शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक जागेवरच आहेत, अशा शब्दात शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांना सुनावले होते. 


दरम्यान यानंतर आता शिंदे गटाने पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत चांगला समाचार घेतला आहे. यावेळी नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केलेल्या रुपेश पालकर याने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा करत 'शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात जे गेले त्यांना ओळखत नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावावर शिवसेना कार्यालय आहे, या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयवर दावा करणार असे ते म्हणाले. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात आता मोठे रणकंदन होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे गट नाशिक शहर पदाधिकारी तसेच खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


तर माजी माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Borste) म्हणाले की, संजय राऊत हे शनिवार व रविवार फक्त पर्यटनासाठी येतात. शिवसेना हा वटवृक्ष पण संजय राऊत बांडगुळ आहेत, बांडगुळ हे वटवृक्ष संपवतात अशी जहरी टीका माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी यावेळी केली. संजय राऊत स्वतःला प्रतिउद्धव ठाकरे समजतात असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर संजय राऊत आव्हान देतात कि निवडणूक लढवून दाखवा, तुम्ही साधी नगरपालिकेची काय सरपंचाची निवडणूक लढवलेली नाही, तुम्ही कोण आम्हाला पाडणार आहे. आमच्याबद्दलचा निर्णय नाशिकची जनता घेईल आणि नाशिककरांना माहिती आहे आम्ही कोण आहोत. संजय राऊत यांनी माझा डीएनए तपासण्याची गरज असल्याचे म्हटले मात्र तुमचा जर डीएनए तपासाला तर तो शिवसेनेचा नसेल, अशा शब्दांत संजय राऊत यांना अजय बोरस्ते यांनी सुनावले आहे. 


हेमंत गोडसे संतापले... 


ज्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत युती झाली, हे सर्व कटकारस्थान हे संजय राऊतं यांचं होत.  जेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेची अनैसर्गिक युती झाली, तेव्हापासून शिवसेनेचे सर्वच आमदार, खासदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी या प्रत्येकाच्या मनामध्ये खदखद होती, अनैसर्गिक युती ही चुकीची झालेली आणि याला सगळ्यात मोठं कारण हे संजय राऊत आहे. त्यांच्यामुळे अडीच वर्षांमध्ये सत्ता असताना देखील कोणी पक्षात आलं नाही, लोकांची शहरांमध्ये काम झाली नाही, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला मतदारसंघात काम करता आले नसल्याचा आरोप हेमंत गोडसे यांनी केला.