Sant Nivruttinath Palkhi : हजारो वारकऱ्यांची पाऊल पंढरीच्या (Pandharpur) दिशेने चालू लागली आहेत. 2 जून रोजी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) इथून निघालेली संत निवृत्तीनाथांची पालखी लोणारवाडीतील मुक्कामानंतर दातलीच्या दिशेने सुरु झाली आहे. तर मुक्ताईनगर इथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी चिखली येथील मुक्कामानंतर आज बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील भरोसा फाटा येथे विसावणार आहे. 


पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. यात त्र्यंबकेश्वर निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी (Sant Nivruttinath Palkhi) आणि मुक्ताईनगरच्या (Muktainagar) कोथळी येथून निघालेली संत मुक्ताबाईंची (Sant Muktabai Palkhi) पालखी या दोन्ही पालख्या 2 जून रोजी पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. दरम्यान संत निवृत्तीनाथांची पालखी काल पळसे इथून निघून सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी गावात विसावली. तर आज लोणावरवाडीहून निघून दातलीला रवाना झाली आहे. दुसरीकडे संत मुक्ताबाईंची पालखी काल चिखली येथे मुक्कामी होती. आज ती भरोसा फाटाकडे चालू लागली आहे. 


नाथांची पालखी आज कुठे मुक्कामी 


दरम्यान आज सकाळी संत निवृत्तीनाथांची पालखी लोणारवाडी इथून 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम' असा गजर करत पंढरीच्या दिशेने कूच निघाली. यावेळी नाथांच्या पालखीला उपस्थित ग्रामस्थांनी मोठ्या भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यानंतर पालखीचे दुपारचे जेवण सिन्नर तालुक्यातील दातली इथे होणार असून याच ठिकाणी पालखीचे पहिले गोल रिंगण पार पडणार आहे. आज जवळपास वीस किलोमीटरचे अंतर कापून संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी, मुसळगाव, दातली मार्गे खंबाळे गावात पोहोचणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 08  जून रोजी संत निवृत्तीनाथ पायी दिंडी पारेगाव येथे मुक्कामाला जाणार आहे. 


मुक्ताबाईंची पालखी आज कुठे मुक्कामी? 


तर संत मुक्ताबाई (Sant Muktabai Palkhi) आषाढी पालखी पायी दिंडी सोहळा काल चिखली गावात मुक्कामी होता. आतापर्यंत पाच दिवसात या पालखीने शंभरहून अधिक किलोमीटरचे अंतर पार केले आहे. तब्बल 600 किमीचा पायी प्रवास असून 25 दिवसांत राज्यातील सहा जिल्ह्यांतून मार्गस्थ होत मुक्ताई पालखी दिंडी पंढरपुरात दाखल होते. सर्वात लांब पल्ल्याची मुक्ताबाईंची दिंडी असून शुक्रवारी श्रीक्षेत्र कोथळी पंढरपूरकडे प्रस्थान केले. वारकरी (Warkari) भाविक आणि शहरवासियांनी रखरखत्या उन्हातही संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला हजेरी लावली. पालखीचा पहिला मुक्काम नवे मुक्ताई मंदिर इथे झाला. त्यानंतर पाच दिवसांपासून मुक्ताई पालखीचा पायी प्रवास सुरु असून आज सकाळी चिखली येथून निघाल्यानंतर दुपारी बेराला फाटा येथे दुपारचे जेवण करुन त्यानंतर आजचा मुक्काम भरोसा फाटा येथे असणार आहे.