Sanjay Raut : नाशिकच्या (Nashik) शिवसैनिकांशी भेटीगाठी होत असून आगामी मनपा, लोकसभा निवडणुकांची (Election) चर्चा केली जात आहे. शिवाय आगामी नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) हाच चेहरा असणार आहे. हेमंत गोडसे (Hemant Godse) चेहरा होता का? असा सवालच थेट संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 


शिवसेनेचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. भाजप आणि शिंदे गटावर जोरदार ताशेरे ओढत नाशिकच्या शिवसैनिकांमध्ये ऊर्जा ओतण्याचे काम संजय राऊत यांनी केले. शिवाय नाशिकचे शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले खासदार हेमंत गोडसे यांचा चांगला समाचार घेतला. नाशिकच्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज असून शिवसेना हाच चेहरा असणार यात शंका नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी हेमंत गोडसे याना टोला लगावला. 


यावेळी संजय राऊत म्हणाले, शिवसेनेतून एक गट बाहेर पडल्यानंतर इथले खासदार देखील शिवसेनेतून बाहेर पडले. शिंदे गटात गेले. मात्र त्यांनी स्वतःची कबर खोदली. त्यांना भविष्य नाही. नाशिक लोकसभेसाठी शिवसेना हा चेहरा असून हेमंत गोडसे चेहरा होता का? शिवसेना हा चार अक्षरी शब्द असून ती आपल्या सर्वांची ताकद आहे. राज्यभरात हजारो, लाखो शिवसैनिक शिवसेनेत आहेत. त्यावर खासदार, आमदार निवडून येतात. एखादा गट निर्माण करून काही होत नाही, कितीही खोके लावा, कोणताही गट निवडून येत नाही, या राज्याची जनता खोक्याला विकली जात नाही. आमदार विकले गेले असतील, खासदार विकले गेले असतील, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला. 


कुणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळतंय... 
तसेच सामनाचा संपादक बदलल्याचा प्रश्नांवर ते म्हणाले कि, कुणी सांगितलं, असं काही नाही. पक्षाचा नेता असून सामनाचा संपादक आहे. शिवाय तुरुंगातूनही अनेक अग्रलेख लिहले. मुळात माझा कंड रिपोर्टरचा, त्यातही क्राईम रिपोर्टर, त्यामुळे कुणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळतंय. त्या गटात काय चाललंय हे मला कळलंय. मात्र आता ही वेळ नाही, वेळेवर स्फोट होईल, असा इशारा देखील दिला. तुरुंगात असतानाही त्याच पदावर होतो, तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याच पदावर आहे. खोकेवाल्या आमदारांसाठी प्रेस घेतली नाही. मात्र गद्दाराच्या कपाळावर लिहले आहे, खोके चोर आहे. तर नारायण राणे यांचे डोके ठिकाणावर नसल्याचे म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले.