Sanjay Raut Nashik : कर्नाटकने (Karnataka) सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) जलसमाधी घ्यायला हवी, पाणी सोडलंय जा, त्या पाण्यात समाधी घ्या. स्वाभिमानासाठी शिवसेना (Shivsena) सोडली. आता कुठे आहे तुमचा स्वाभिमान, आता कुठे गेली तुमची क्रांती, आता खरी क्रांती करण्याची वेळ आली. मग मूग गिळून का बसला आहेत असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केला आहे. 


शिवसेनेचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. भाजप आणि शिंदे गटावर जोरदार ताशेरे ओढत नाशिकच्या शिवसैनिकांमध्ये ऊर्जा ओतण्याचे काम संजय राऊत यांनी केले. ते म्हणाले. तीन महिन्यांपासून सुरु असलेला कारभार बघता लोकांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे, मात्र लोक शिवसेनेच्या पाठीशी उभे राहत आहेत. अनेक लोक भेटत आहेत, गाऱ्हाणी मांडत आहेत. मात्र जे गेले तो पालपाचोळा होता, तो उडत असतो इकडे तिकडे, ते राजकारणात नवीन नाही. मात्र शिवसेना जागेवर असल्याचे राऊत म्हणाले . 


संजय राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेतून जे बाहेर पडले, त्यांचे भविष्य खरे नाही. गद्दार असा उल्लेख लोक करत आहेत. आम्हाला करायची आवश्यकता नाही. मात्र ते खोके चोर आहेत. शिवसेना सोडून गेलेल्या आमदार, खासदाराचे भविष्य चांगले दिसत नाही. सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढली. आम्हाला कोणी काही करत नाही, आज मी आलोय, फिरतोय मर्दासारखा. सुरक्षेची गरज त्यांना असून कारण, त्यांना भीती आहे. जनता खवळली तर काय होईल? सत्ताधारी घाबरून आहेत, म्हणून सुरक्षा काढल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 


तसेच सामनाचा संपादक बदलल्याचा प्रश्नांवर ते म्हणाले कि, कुणी सांगितलं, असं काही नाही. पक्षाचा नेता असून सामनाचा संपादक आहे. शिवाय तुरुंगातूनही अनेक अग्रलेख लिहले. मुळात माझा कंड रिपोर्टरचा, त्यातही क्राईम रिपोर्टर, त्यामुळे कुणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळतंय. त्या गटात काय चाललंय हे मला कळलंय. मात्र आता ही वेळ नाही, वेळेवर स्फोट होईल, असा इशारा देखील दिला. तुरुंगात असतानाही त्याच पदावर होतो, तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याच पदावर आहे. खोकेवाल्या आमदारांसाठी प्रेस घेतली नाही. मात्र गद्दाराच्या कपाळावर लिहले आहे, खोके चोर आहे. तर नारायण राणे यांचे डोके ठिकाणावर नसल्याचे म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले.  


छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही 
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. मात्र भाजप यावर गप्प बसून आहे. तर दुसरीकडे गुजरातच्या एका प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांना रावण म्हणण्यात आले. यानंतर अनेक भाजप पक्षांच्या अनेक नेत्यांनी रोष व्यक्त करत गुजरात राज्याचा अपमान झाल्याचे म्हटलं, मग छत्रपती शिवरायांचा अपमान होत नाही का? भाजपमध्ये जणू छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची स्पर्धा लागल्याचे दिसते आहे. त्याच्यावर कुणी बोलत नाही. याला उत्तर दिल जाईल, छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेतला जाईल. अनेक शिवसैनिकांना नोटीस दिल्या जात आहेत, तडीपारीची नोटीस दिल्या जात आहेत. बंदमध्ये सहभागी होत असल्याने, मात्र हे खपवून घेतले जाणार नाही.