CM Eknath Shinde Nashik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज सायंकाळी नाशिक (Nashik) दौऱ्यावर येत असून ते मालेगाव (Malegoan) मुक्कामी असणार आहेत. या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील रस्ते चकाचक करण्यात आले असून मनपा (Malegoan Mahapalika) दालनाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे मालेगाव शहराला एकप्रकारे रौनक प्राप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत असून मुख्यत्वे मालेगाव तालुक्यात अनेक कार्यक्रम असून शहरात जाहीर सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगाव मनपा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मालेगावच्या रस्त्यांसह मनपा कार्यालय, इतर महत्वाची ठिकाणी दुरुस्त करण्यात आली असून काही ठिकाणच्या कार्यालयांचे रुपडेच बदलून टाकण्यात आले आहे. शिवाय मुख्यमंत्री शिंदे हे मालेगाव मुक्कामी असणार आहेत. त्यादृष्टीने विशेष सुविधा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मालेगाव मुक्कामी येत असून अत्यंत संवेदनक्षम या शहरात मुख्यमंत्र्यांचा मुक्काम गिरणा विश्रांती गृहात होणार आहे. दोन्ही विश्रांतीगृहांची रंगरंगोटी करण्यात आली आहे.मुख्य दालनासाठी तर स्वतंत्र सोफा सेट खरेदी करण्यात आला आहे. शयनगृहात नव्याने व्यवस्था करण्यात आली असून डायनिंग हॉलचे तर फर्निचरच नव्याने करण्यात येत आहे. तसेच शहराच्या मुख्यप्रवेशद्वाराकडून येणाऱ्या रस्त्याची रंगरंगोटीसह डागडुजी करण्यात आली आहे. या रस्त्यावर अग्निशमन दलाच्याकडून बंबांच्या माध्यमातून पाणी टाकून रस्ता स्वच्छ धुण्यात आला आहे. तसेच दुभाजकांची देखील दुरुस्ती केली आहे. प्रशासनाकडून दिवसरात्र सज्जतेचे कामकाज सुरु आहे.
पोलिसांची कडक सुरक्षा
मुख्यमंत्र्यांचा मालेगाव मुक्काम सध्या चर्चेत आहे. यापूर्वी शहर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक अथवा धुळे (Dhule) मुक्कामाला पसंती दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या शिंदे सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असल्याने विशेष काळजी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष सुरक्षा असते. याशिवाय मालेगाव पोलिसांकडून विश्रांतीगृहाला रात्रभर 15 ते 20 सशस्त्र पोलीस कर्मचारी एक पोलिस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षकांचा पहारा राहणार आहे .
एका दिवसात रस्ते चकाचक
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच येत्या शनिवारी मालेगाव दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासन कामाला लागले असून शहरात जोरदार तयारीला वेग आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरातील ज्या प्रमुख रस्त्यांवर जाणार असल्याने शहराच्या मुख्यप्रवेशद्वारकडून येणाऱ्या रस्त्याची रंगरंगोटीसह डांगडुजीला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून दिवसरात्र सज्जतेचे कामकाज सुरु आहे. अवघ्या एका रात्रीतून मोतीबाग नाका भागातील रस्त्याची तसेच दुभाजकाची डागडुजी करण्यात आली. या रस्त्यावर अग्निशमन दलाच्याकडून बंबांच्या माध्यमातून पाणी टाकून रस्ता स्वच्छ धुण्यात आला आहे. तसेच दुभाजकांची देखील दुरुस्ती केली आहे. प्रवेशद्वाराजवळील जाळीला तसेच दुभाजकांना रात्रीतून रंग देण्यात आला आहे.