Nashik News : 'टोइंग वाले झाले मस्त, नाशिककर झाले त्रस्त, पार्किंग नाही पुरेशी, म्हणून गाडी लावली कडेशी, वाहन झाले टोईंग, नाशिककर झाले रोईंग' असे विविध निषेध फलकानी लक्ष वेधून घेतले. निमित्त होते नाशिक (Nashik) शहरात मुजोरपणाने टोईंग (Toing) कारवाई केली जात असल्याचे आप (AAP) कडून जिल्हा रुग्णालय परिसरात आंदोलन (Protest) करण्यात आले. 


नाशिक (Nashik) शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीला आळा बसावा यासाठी टोईंग कारवाई सुरु आहे. या संदर्भात अनेकदा नागरिकांनी  आंदोलने देखील केली. मात्र नाशिक वाहतूक पोलिसांकडून (Nashik Traffic Police) टोईंग विरोधातील कारवाई सुरूच आहे. नंतरच्या काळात खासगी ठेकेदाराला टोईंग दिल्यानंतर नाशिककरांची पार्किंग केलेली वाहने सर्रासपणे उचलून टोईंग वाहनात उचलले जातात. त्यामुळे एकीकडे नाशिक शहरात वाहन पार्कींगची बॉम्ब असताना वाहतूक विभाग मात्र वाहन टोईंगची कारवाई करत आहे. याचा जाब विचारण्यासाठी आप कडून निषेध आंदोलन करण्यात आले. 


दरम्यान टोईंग विरोधात नाशिककरांनी अनेकदा आंदोलने केली, पार्किंगसाठी जागा द्या, लागेल तो दंड भरण्यास आम्ही तयार राहू. मात्र महापालिकेकडून अद्यापही नाशिककरांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. परिणामी वाहन धारक रस्त्याच्या कडेला, इकडे तिकडे आजूबाजूला गाडी पार्क करून बाजारात जातात. मात्र वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून त्या वाहनावर कारवाई केली जाते. त्याचबरोबर या परिसरात दोन मुख्य बसस्थानक असून दररोज अनेक प्रवासी येत असतात. इतर ही नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते. परंतु महानगरपालिकेने या ठिकाणी देखील पार्किंगची व्यवस्था केलेली नाही आहे. मात्र काही वेळातच या ठिकाणी वाहतूक विभाग येऊन कारवाई करत आहे. त्यामुळे वाहन कुठे पार्क करायची असा प्रश्न वाहन धारकांसमोर समोर उपस्थित झाला आहे. 


पार्किंगची व्यवस्था करा... 
स्मार्ट शहर म्हणून नाशिक शहराची ओळख होवू पाहत आहे. मात्र, शहरात वाहन पार्किंगला जागाच नाही. मग वाहन पार्क कुठे करावं असा प्रश्न पडतो. नाईलाजास्तव जिथे जागा मिळेल, तिथे नागरिक वाहन पार्किंग करतात आणि त्यानंतर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. विशेष म्हणजे वाहतूक विभागाने टोईंगचा ठेका दिला आहे. त्यातील कर्मचारी अनेक वेळा नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात. तरीही वाहतूक विभाग त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाही. पार्किंगची जागा उपलब्ध करून द्या त्यानंतरच जे वाहन चालक नियम तोडतील त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा नाशिककरांना या विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल अशी संतप्त प्रतिक्रिया आपचे जितेंद्र भावे यांनी दिली आहे.