Nashik Bus Accident : नाशिक (Nashik) शहरानजीक आज दुपारी भीषण अपघात (Nashik Bus Accident) झाला. या अपघातात बसने पेट घेतल्याने दोन दुचाकीस्वारांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातचा प्राथमिक अहवाल समोर आला असून अहवालावरून वेगात सुटलेल्या बसने दोन दुचाकीस्वारांना चिरडत इतर वाहनांना धडक दिली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर आज दुपारी एक वाजेच्या सुमारास शिंदे टोलनाका (Shinde Toll Naka) चौफुलीवर परिवहन महामंडळाच्या बसचा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतला आहे. या भयंकर अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.तर अपघातानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली. नाशिक बस अपघातात होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एकाचे नाव रवींद्र सोमनाथ विसे तर दुसऱ्याचे नाव मदन दिनकर साबळे असे असून ते बजाज पल्सर गाडी नाशिककडे येत होते. दरम्यान, हे दोघेही युवक नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील समशेरुपुर येथील रहिवाशी असून ते नाशिकला लग्नासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस यंत्रणा व तपास यंत्रणांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार नाशिक-पुणे महामार्गांवर शिंदे पळशे गावाजवळील स्पीड ब्रेकरजवळ क्रेटा कारने वेग कमी करून जात असतांना तिच्यामागे सिन्नर आगाराची बस धावत होती. सिन्नर आगाराच्या बसच्या मागे तीन वेगवेगळ्या मोटार सायकल या धावत होत्या. याचवेळी पाठीमागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या राजगुरूनगर आगाराच्या बसने पुढील तिन्ही दुचाकींना जोरात धडक देऊन पुढे धावणाऱ्या सिन्नर आगाराच्या बसच्या पाठमागील भागास धडक दिली. त्यामुळे सिन्नर आगार बसच्या पुढे धावणाऱ्या क्रेटा कारला धडक दिली.
याच सुमारास दोन मोटार सायकल राजगुरूनगर आगाराच्या बसच्या इंजिनच्या भागात घसरत घुसल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे राजगुरूनगर आगाराच्या बसने पेट घेतला. त्यात प्राथमिक माहिती नुसार दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तसेच तिन्ही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. राजगुरूनगर आगाराची बस देखील पूर्ण जळाली आहे. या अपघातात एक दुचाकीस्वाराचा पाय फ्राक्चर झाला. तिसऱ्या दुचाकीस्वाराची अद्याप माहिती मिळाली शकली नाही. जवळपास 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटल नाशिक रोड, जिल्हा रुग्णालयात व सिन्नर येथे दाखल केले आहे. दरम्यान अपघातातील जखमींना नाशिक 1 आगार, नाशिक 2 आगार व सिन्नर आगार मदत करत आहे.