Nashik On Gujrat Election : 'आमच्याव इलेक्शनचा नाय फरक पडत, ज्या आपल्याआढ हाय, त्याचं ते बाजूनी हाये, कोण आला कोण गेला, आम्हाला पडेल न्हाय, आमचा काम अन आम्ही' आपले सरकारला आम्ही काय जास्त मागत नाय, थोडा पोटापूरता मिळाला ना की बास' हे बोल आहेत नाशिक जिल्ह्यातील गुजरात सीमेवर असलेल्या गावकऱ्यांचे.
आज सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणुकीचा (Gujrat Election) निकाल लागला असून भाजपने बहुमत घेतल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. या निकालानंतर ठिकठिकाणी विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यातील गुजरात सीमेवरील गावांशी चर्चा केल्यानंतर फारसा पडला नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. गुजरात राज्यातील गावांपेक्षा आपल्या गावांमध्ये सुविधांचा अभाव आहे, हे महाराष्ट्र सरकार सुद्धा नाकारू शकत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), पेठ तालुके गुजरात सीमेवर आहेत. नुकताच सुरगाणा तालुक्यातील काही गुजरात सीमेवरील गावांनी गुजरात राज्यात विलीन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा वाद चांगलाच रंगला होता. मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र पुन्हा एकदा या मागणीनंतर गुजरात सीमेवर असलेल्या गावांच्या दुरावस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे दोन चार किलोमीटर असलेल्या गुजरात राज्यातील गावांना सर्व सोयीसुविधा मिळत असतांना मात्र महाराष्ट्रात असलेल्या गुजरात सीमेवरील गावांना मात्र आजही पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वेळोवेळी जाणवते.
सुरगाणा तालुक्यातील पांगरने, खुंटविहिर, कातळपाडा, रगतविहीर, श्रीभुवन, बर्डीपाडा, कुकडणे यासारखी अनेक गावे गुजरात सीमेवर आहेत. आजच्या इलेक्शन संदर्भांत या गावांशी चर्चा केल्यानंतर फारसा फरक पडला नसल्याचे ते म्हणाले. तर इकडे पेठ तालुक्यातील नालशेत, पिठूंडी, कळंमपाडा, सादडपाडा (रानविहीर), डौलपाडा, राजबारी ही गावे देखील एक ते दोन किलोमीटरवर आहेत. ही गावे देखील पायभूत सुविधांपासून वंचित आहेत. मात्र आम्ही आमच्या कामात खुश आहोत, आम्हाला कोण आला, कोण गेला काही फरक नाही, आम्ही गुजरात जायचं ठरलं तर जातो, नाहीतर तालुक्याच्या ठिकाणी कामकाज करत असल्याचे ग्रामस्थ म्हणाले.
तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बराचसा भाग गुजरात राज्याच्या सीमेवर आहे. यामध्ये कसोली, कास, घोडमाणी, पाटाचा माळ ही गावे अवघ्या गुजरात सीमेपासून पाचशे मीटरवर आहेत. देवडोंगरा, ओझरखेड याचबरोबर इतरही गावे आहेत. या गावातील नागरिकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने आमच्या लोकांकडे लक्ष द्यायला हवे, मग गुजरात राज्यात जाण्याची गरज पडणार नाही, इलेक्शन सगळीकडे सारखच, मात्र बाजूच्या सर्व सुख सुविधा आपण वंचित का? असा प्रश्न पडतो. पण सांगणार कोणाला? इकडे तर आपले मंत्रीही फिरत नाहीत, मात्र आम्ही आमच्या आयुष्यात समाधानी असल्याचे गावकरी म्हणाले.
एकूणच आज गुजरात इलेक्शन पार पडले. भाजपने एकहाती सत्ता मिळवली. मात्र या इलेक्शनचा महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नागरिकांना फारसा फरक पडला नसल्याचे दिसते. मात्र गुजरात राज्यातील गावांप्रमाणेच आमच्याही गावात शिक्षण, आरोग्य, पाणी असायला हवे, अशी अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र सरकारने याबाबत विचार करणे महत्वाचे असल्याचे दिसून येत आहे.