Nashik Godavari : नाशिकची (Nashik) जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारे गोदावरी (Godavari) आज दुथडी भरून वाहते आहे. सध्या जिल्हाभरात पाऊस सुरु असल्याने गोदावरीला पूर (Godavari Flood) आला आहे. मात्र उन्हाळ्यात गोदावरीची या उलट परिस्थिती असते. म्हणजेच गोदावरी अनेक ठिकाणी प्रदूषित (Godavari Pollution) असल्याचे दिसून येते. यासाठी स्थानिक पातळी ते केंद्र स्तरापर्यंत गोदावरी संवर्धनासाठी झटत आहेत. आता यात नाशिक मनपा (Nashik NMC) शिक्षण विभाग देखील पुढे सरसावला आहे. 


गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ यासह अनेक सामाजिक संस्था गोदावरीच्या प्रदूषण हटविण्यासाठी झटत आहेत. तरीदेखील गोदावरी नदीपात्रात रसायनयुक्त पाणी, पावसाळी गटारींमध्ये पाणी पुढे नदीला मिळते. कपडे धुणे, पानवेली या सर्व गोष्टींतून प्रदूषण होत असल्याची गंभीर बाब नोंदविण्यात आली आहे. गेली कित्येक वर्षे गोदामाई निमुटपणे होत असलेला हा अत्याचार सहन करत आहे. 


दरम्यान गोदा प्रदूषण मुक्त चळवळीत आता महापालिकेचा शिक्षण विभागही पुढे सरसावला आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी गोदावरी नदीच्या स्वच्छतेबाबत विद्यार्थी आणि शिक्षक शपथ घेणार आहेत. गोदा संवर्धनासाठी प्रार्थना म्हटली जाणार आहे.  लवकरच हे गीत स्वरबद्ध केले जाणार आहे. त्याशिवाय शालेय स्तरावर पुढच्या वर्षी 25 मे 2023 पर्यंत प्रत्येक महिन्याला होणा-या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार आहे. जुलै महिन्यात रांगोळी स्पर्धा, ऑगस्टमध्ये निर्माल्य आणि इतर कचरा नदीत टाकू नये याबाबत जनजागृती केली जाणार आहे. 


असे आहेत कार्यक्रम
सप्टेंबरमध्ये निर्माल्यापासून खत निर्मिती, ऑक्टोबरमध्ये प्लास्टीक कचरा रस्त्यावर किंवा नदीत टाकू नये याबाबत जनजागृती, नोव्हेंबर महिन्यात नदीच्या स्वच्छतेबाबत उपक्रम सुचवा स्पर्धा घेण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये ‘मी गोदावरी नदी बोलते’ या विषयावर  एकपात्री नाटक नाट्य स्पर्धेत घेतले जाणार आहे. तसंच जानेवारी 2023 मध्ये ‘गोदावरी स्वच्छता’ यावर गीतरचना स्पर्धा घेतली जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये नदीच्या स्वच्छतेबाबत ‘मी नाशिक’ या नात्यानं या विषयावर वकृत्व स्पर्धा होणार आहे. मार्चमध्ये ‘गोदावरी नदी वाचवा’ यावर शासकीय कर्मचा-यांमध्ये जनजागृतीची शपथ घेतली जाणार आहे.  


दरम्यान मोहिमे विषयी मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनिता धनगर म्हणाल्या कि, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रणाबाबत समितीच्या त्रैमासिक बैठकीतील सुचनांची काटेकोर अंमलबजावणी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून केली जात आहे. याबाबत सर्व केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून गोदावरी नदीचं प्रदूषण दूर होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी  व्यक्त केला आहे.