Nashik Potholes : नाशिकमधील (Nashik) रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत (Potholes) आता न बोललेलंच बरे अशी अवस्था सध्या नाशिककरांची झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यापासून सातत्याने नाशिककर रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल जाब विचारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून खड्डे बुजवले जात आहेत. मात्र पावसामुळे (Rain) पुन्हा परिस्थिती जैसे थे होत आहे. तर बुजवल्या खड्ड्यातून खडी रस्त्यावर येत असल्याने अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे सध्या नाशिककर हैराण झाल्याचे चित्र आहे. 


गेलीत अनेक दिवसांपासून म्हणजेच पावसाळा सुरु झाल्यापासून नाशिककर रस्त्यांवरील खड्ड्यांनी बेजार झाले आहेत. शहरात जिकडे तिकडे खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. यामुळे नाशिककर वैतागले आहेत. तर या पार्श्वभूमीवर नाशिक पालिका प्रशासन देखील खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेसाठी जोमाने काम करीत आहेत. मात्र खड्डे बुजविल्यानंतर पावसाने पुन्हा खड्डे डोके वर काढत आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या दवाखान्यांत साथीच्या आजारापेक्षा पाठीच्या आजारांचे रुग्ण अधिक येत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिककर पुरते वैतागले असल्याने प्रशासनाला दोष देण्यापेक्षा या परिस्थितीतून गेलेलेच बरे अशी धारणा सध्या नाशिककर बाळगून आहेत. 


दरम्यान नाशिकचे स्वच्छता मॅन म्हणून ओळखले जाणारे चंद्रकिशोर पाटील हे सकाळी शहरात फिरत असताना त्यांच्यासमोर खड्ड्यांमुळे आणि खड्ड्यांत टाकलेल्या खडीमुळे तीन अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. एका अपघातात तर एका महिला शहर बसेवेच्या चाकाखाली जाता जाता वाचली. पहिली घटना सिटी सेंटर मॉल जवळ घडली. या ठिकाणी देखील खड्डयांचा रस्ता असून खडीवरून गाडी स्लिप होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तर दुसऱ्या घटनेत मायको सर्कल परिसरात खड्ड्यांच्या शर्यतीत दुचाकीस्वार मागे पडला. त्याला देखील दुखापत झाली. तर तिसरी घटनेत एक महिला बाल बाल बचावली. शहरातील संभाजी चौकामध्ये एक महिला रस्त्यात एका मागोमाग एक खड्डा आल्याने सदर महिलेने ब्रेक लावले. यावेळी गाडी स्लिप झाली. याचवेळी बाजूने जाणाऱ्या शहर बस सेवेच्या चाकाखाली महिला आली. मात्र वाहकाच्या समयसूचकतेमुळे त्याने ब्रेक मारले. शेवटी महिलेला गाडीखालून तातडीने बाहेर काढण्यात आले. 


एकीकडे प्रशासन पुढील एक महिन्यात शहरातील खड्डे बुजवून रस्ते चकाचक करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र दुसरीकडे दर मिनिटाला नाशिककरांना मात्र खड्ड्यांशी दोन हात करावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यात आता रस्त्यावरील खडीने भर टाकली असून रस्ता, खड्डा आणि रस्त्यावरील खडी या तिघांची एकी झाल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. मात्र नाशिककरांना या तिघांशी तुंबळ युद्ध करून घर, ऑफिस, बाजार गाठावा लागत आहे. एकूणच नाशिककरांना पुढील काही दिवस नाशिकच्या रस्त्यांशी हातमिळवणी करून प्रवास करावा लागणार आहे. तरच या सर्वांपासून सुटका होईल असे सध्या दिसते आहे. 


नाशिकचे रस्ते 'खड्डेमय' 
नाशिक शहरात पावसाळ्यापूर्वी खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र या चार दिवसांच्या पावसात रस्त्यांची धूळधाण उडाली आहे. शहरातील निमाणी बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक, श्रीरामी विद्यालय, पेठरोड, तारवालानगर, राऊ हॉटेल परिसर, रविवार कारंजा यासह उपनगरातील रस्त्यांची या पावसामुळे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून खड्डे बुजवताना वापरण्यात आलेली खडीही अस्ताव्यस्त पडलेली दिसून येत आहे. यामुळे दुचाकी वाहनधारकांना आपले वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्डा आहे की नाही, हेही वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे वाहनधारक पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. 


रस्ते भारी, शहर भारी 
दरम्यान ज्या शहरातील रस्ते भारी, ते शहर भारी, असं म्हटले जाते. कोणत्याही शहराचा विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो. मात्र स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहरातील रस्ते व्हेंटिलेटरवर असल्यासारखे भासत आहेत. शहरामध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून पडत आहे. नाशिक महापालिकेने सुरू केलेल्या पावसाळी गटार योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ही गंभीर स्थिती नित्याचीच झाली आहे. नाशिकमध्ये थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडतात, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन घसरण्याचे प्रकार घडत आहेत.