Nashik Politics : दहाहून अधिक माजी नगरसेवकांना घेऊन जात शिंदे गटात (Shinde Sena) प्रवेश करणाऱ्या अजय बोरस्ते (Ajay Borste) यांना शिंदे गट प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर बोरस्ते यांची जबाबदारी वाढली आहे. 


नाशिक (Nashik) महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी जबाबदारी देत त्यांची बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिक जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी राजू लवटे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांची भेट घेत अजय बोरस्ते यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानुसार बोरस्ते यांच्यावर आगामी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी राहणार आहे. त्यादृष्टीने पक्ष वाढीचे आव्हान असणार आहे. 


यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. ज्यावेळी अजय बोरस्ते यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. त्यावेळी त्यांनी नाशिकमध्ये अभेद्य समजल्या जाणाऱ्या ठाकरे गटाला मोठे भगदाड पाडले. एकाच वेळी बारा माजी नगरसेवक आणि शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटात जिल्हा संपर्क प्रमुख असलेले भाऊसाहेब चौधरी यांना शिंदे गटात गेल्यावर त्यांची सचिव पदी नियुक्ती करून बढती देण्यात आली होती. त्यानंतर बोरस्ते यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात होते. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ज्या पद्धतीने शिंदे गट, ठाकरे गट यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. जो तो कुरघोडीचे भाषा करत असल्याने दिसून येत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या ठाकरे गटाच्या शिलेदारांना शिंदे गटात चांगलाच मान मरातब मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरवातीला काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर अजय बोरस्ते यांच्या नेतुत्वाखाली चांगली फळी शिंदे गटात सामील झाली आणि ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले. या उलट देखील संजय राऊत यांच्या जवळचे असलेले भाऊ चौधरी देखील बाहेर पडले. भाऊ चौधरी हे शिंदे गटात गेल्या गेल्या त्यांच्यावर महाराष्ट्र सचिव पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर माजी नगरसेवकांना घेऊन गेलेले अजय बोरस्ते यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.