Nashik Crime : नाशिकमधील (Nashik) सिडको परिसरातील पीटीच्या शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार (Molestation) केल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. नाशिकरोड परिसरातील जयभवानी रोड परिसरातील एका संशयिताने अपंग वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 


नाशिकच्या जय भवानी रोड जवळील जेतवन नगर येथे पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या साठ वर्षाच्या अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी देत परिसरातील युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी उपनगर पोलिसात माहिती दिल्यानंतर संबंधित तरुणाला ताब्यात घेत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने वृद्ध महिलेवर अत्याचार करत फोटो काढले असून कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठत संशयित साहिल आवारे या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 


अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध महिलेवर अत्याचार


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या वृद्ध महिलेला आठ वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने ती अंथरुणाला खिळून होती. शेजारी राहणारा भाऊ तिची देखभाल करता असतो. भावाच्या घराशेजारीच पत्र्याच्या खोलीत ही पीडित महिला एकटीच राहते. सोमवारी (9 जानेवारी) रात्री पीडित महिला दरवाजाला आतमधून दगड लावून तसेच दिवे सुरु ठेवून जेवण करुन झोपलेली होती. रात्री एकच्या सुमारास दरवाजा उघडून अनोळखी व्यक्ती आत आली. हे लक्षात आल्यावर वृद्धेने कोण आहे? अशी विचारणा केली असता तो त्याच भागात राहणारा संशयित साहिल नाना आवारे हा असल्याचे स्पष्ट झाले. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. परंतु संशयित साहिलने महिलेचे तोंड दाबत ओरडण्याचा प्रयत्न केला  आणि कोणाला सांगितले तर मारुन टाकेन, अशी धमकी दिल्याचं वृद्ध महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.


दरम्यान घटना घडल्यानंतर सकाळी वृद्धेचा भावाचा मुलगा चहा देण्यास गेला असता महिलेने रात्री घडलेला प्रकार सांगितला. संतप्त झालेल्या पीडित महिलेच्या नातेवाईकांनी उपनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तातडीने हजर झाले. तपासाची चक्रे फिरवल्यानंतर संशयित साहिल आवारे यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हेही वाचा