Jalgaon News : राष्ट्रवादीचे पक्षाच्या (NCP) घड्याळाचे काटे सध्या ठिकाणावर नाहीत, हे काटे ठिकाणावर राहावेत, म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंगळग्रह मंदिराला साकडं घालावं, असा सल्ला भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिला आहे. खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) आणि आमदार अनिल भाईदास पाटील (Anil Patil) यांच्यात मंगळग्रह मंदिराच्या कार्यक्रमात राजकीय शेरेबाजीवरुन कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले. 


सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारण चांगलेच तापले असून राजकीय एकमेकांवर चिखलफेक करण्यात गुंतल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नुकताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बनंतर हे वातावरण अधिकच तापले होते. यावेळी राष्ट्रवादी पक्ष संदर्भात राज्यासह देशाच्या राजकारणात चर्चा पाहायला मिळाली. मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीचा निर्णय मागे असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकला. अशातच राज्यातील राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांमध्ये हमरीतुमरी होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात एका कार्यक्रमांत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राजकीय शेरेबाजी चांगलीच चर्चेचा विषय ठरली. 


देशातील दुर्मिळ मंदिरांपैकी एकमेव असलेल्या जळगावातील अमळनेर (Amalner) येथील मंगळग्रह (Mangalgrah Mandir) येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी भाजप खासदार, भाजप माजी आमदार, तसेच राष्ट्रवादीचे आमदार यांची एकत्र उपस्थिती सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली, मंगळग्रह मंदिर येथे हेलीपॅडच्या जागेचे भूमिपूजन, यासह सोलर पॅनल असलेले कार पार्किंग यासह विविध कार्यक्रमाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील तसेच अमळनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आमदार आणि खासदार यांनी दोघांनी एकमेकांवर तसेच एकमेकांच्या पक्षावर शाब्दिक टोलेबाजी तसेच टीका केल्याचे पाहायला मिळाले. आमदार अनिल पाटील यांनी बोलताना खासदार उन्मेष पाटील हे वेळेवर चालतील, घड्याळावर चालतील तर पुन्हा खासदार होऊ शकतील, असा टोला लगावला.


'उन्मेष पाटील यांनी घड्याळावर चालावं'


तर उन्मेष पाटील यांनीही बोलताना अजित पवार सोबत आले तर आणखी निधी आणू असं प्रत्युत्तर दिलं. कार्यक्रमानंतर आमदार अनिल पाटील म्हणाले की, "आगामी काळात खासदार उन्मेष पाटील यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी घड्याळावर चालावं." असं म्हणत आमदार पाटील यांनी एकप्रकारे खासदार उन्मेष पाटील यांना राष्ट्रवादीत येण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादीत आले तर ते पुन्हा खासदार होऊ शकतात, असं सुद्धा आमदार अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील यांना खासदार उन्मेष पाटील यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, आमचा पक्ष सक्षम आहे, त्यामुळे मला कुठेही जाण्याची गरज नाही, राष्ट्रवादीचे पक्षाच्या घड्याळाचे काटे सध्या ठिकाणावर नाहीत, हे काटे ठिकाणावर राहावेत, म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंगळग्रह मंदिराला साकडं घालावं. यातून खासदार पाटील यांनी एकप्रकारे आमदार अनिल पाटील यांनी भाजपत यावं असं आवाहन केलं आहे.