Maharashtra Jalgaon News : जळगाव शासकीय (Maharashtra Jalgaon News) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या चुकीच्या सूचनेमुळे बाळांची अदलाबदल झाल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला होता. मुलगा आपलाच असल्याचा दावा दोन्ही पालकांकडून करण्यात आल्याने प्रकरण पोलिसांत गेले होते. नवजात शिशूचे खरे पालक ओळखण्यासाठी पोलिसांनी डीएन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. डीएनए चाचणीनंतर (DNA Test) आज पंधरा दिवसांनी नवजात शिशूच्या मूळ पालकांवर शिक्कामोर्तब होऊन दोन्ही बाळे त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी आपली बालकं कुशीत घेताना दोन्ही मातांना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. 


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical Collage) आणि रुग्णालय येथे 2 मे रोजी दोन गरोदर महिलांना अत्यवस्थ झाल्यामुळे शस्त्रक्रियागृहामध्ये सिजर शस्त्रक्रिया (Seizer) करण्यासाठी घेण्यात आले होते. दोन्ही महिलांना झटके येऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. या प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी त्यांचे वैद्यकीय कौशल्यपणाला लावून दोन्ही मातांचे जीव वाचविले. मात्र त्याचवेळी दोन्ही मातांची बाळं ही त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करताना प्रशिक्षणार्थी परीचारिकेनं दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे, गैरसमजुतीमुळे एकमेकांना देण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून ती बाळे मूळ मातांना दिली. मात्र बाळांचे पालक समाधानी नव्हते.


सदर प्रकरणात पालक समाधानी नसल्याने त्यांनी डीएनए चाचणीची मागणी केली. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्यानुसार दोन्ही माता आणि बाळांचे डीएनए नमुने घेऊन नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. अखेर हा बहुप्रतिक्षित अहवाल मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर हा तिढा सुटला आहे. अनेक दिवसांपासून माता आणि बाळांची झालेली ताटातूट पाहता प्रशासनाने तात्काळ बाळ मूळ मातांना सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र दिवेकर आणि रुग्णालय प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही मातांना त्यांच्या नातेवाईकांसह बोलवण्यात आले. प्रभारी अधिष्ठाता तथा स्त्रीरोग आणि प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे यांनी डीएनए अहवाल वाचून दाखविला. अहवालानुसार सुवर्णा उमेश सोनवणे यांना मुलगी तर प्रतिभा प्रवीण भिल यांना मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोन्ही मातांना त्यांची बाळ सुपूर्द करण्यात आले. यावेळी दोन्ही मातांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले होते. 


एकाच दिवशी दोन्ही माता प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. प्रसूतीनंतर बाळ देताना पालकांचा गैरसमज झाला होता. पालकांच्या मागणींनंतर पोलिसांच्या माध्यमातून डीएनए चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज आला असून या अहवालानुसार दोन्ही नवजात शिशु पालकांना देण्यात आली असून दोन्ही पालक आणि प्रशासन खुश असल्याचं प्रसूती विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे यांनी सांगितले. 


शेवटी डीएनए चाचणी करावी लागली.... 


दरम्यान, बाळ अदलाबदल संशयावरून यांचं दांपत्याने डीएनए चाचणीची मागणी केली होती. या चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर या अहवालानुसार दांपत्याने आपल्याला मुलगी झाली असल्याचं मान्य करून मुलीला ताब्यात घेतलं. सद्यस्थितीत दोन्ही पालक आनंदी असले तरी दोन्ही नवजात शिशूला मात्र कारण नसताना वीस दिवस आपल्या आईपासून दूर राहावे लागले होते. दरम्यान जिल्हा रुग्णालयात अदलाबदल झालेली बालके डीएनए अहवालानंतर वीस दिवसांनी आपल्या मातांचा कुशीत विसावल्याच पाहायला मिळाले आहे.