Nashik Leopard : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील नाशिक वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील पिंपळद (Pimplad) गावाच्या शिवारात काही महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर रेस्क्यू करण्यात आला आहे. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर या बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश मिळाले आहे. सुरवातीला शार्प शूटरच्या माध्यमातून थेट गोळी घालण्याची तयारी वनविभागाने केली होती, मात्र तत्पूर्वीच बिबट्या वनविभागाच्या (Nashik Forest) हाती लागला आहे.
नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, दारणा काठ हा परिसर जणू बिबट्याचे माहेरघर म्हणूनच ओळखला जातो. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यात बिबट्याने आपली पाऊल त्र्यंबकेश्वर शहराजवळील शिरसगाव, पिंपळद, धुमोडी, वेळुंजे आदी भागात वळवली होती. महत्वाचे म्हणजे अनेक लहान मुलांवर हल्ले झाल्याने हा परिसर भीतीच्या सावटाखाली होता. त्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार वनविभागाने पिंपळदच्या घटनेनंतर परिसरात मोठा लवाजमा नेत रेस्क्यू ऑपरेशन सुरु ठेवले होते. मात्र काही केल्या बिबट्या हाती लागत नव्हता.
दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पिंपळद शिवारात सहा वर्षाच्या मुलीवर बिबटयाने हल्ला (Leopard Attack) चढविल्याची घटना घडली. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यांनतर परिसरातील गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व रोष निर्माण झाला होता. वन विभागाने तातडीने पथक तयार करत पिंपळद शिवारात तब्बल 20 पिंजरे आणि 27 पेक्षा जास्त ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. जवळपास पुढील वीस दिवस तळ ठोकून देखील बिबट्याला रेस्क्यू करण्यात अपयश येत गेले. त्याच सुमारास पिंपळद जवळील सापगाव परिसरात एक बिबट्या जेरबंद झाला. मात्र पिंपळद शिवारात धुमाकूळ घालणारा तो बिबट्या नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
बिबट्याला ‘शूट’ करण्याची परवानगी, मात्र...
दरम्यान, उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सोमवारी याबाबत अंतिम बैठक घेत बिबट्याला ‘शूट’ करण्याची परवानगी प्रभारी मुख्य वनसंरक्षकांकडे मागितली. यानंतर पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे हे पाच वनपरिक्षेत्रातील पथकांचा लवाजमा घेऊन पिंपळदमध्ये दुपारी दाखल झाले. वन विभागाने गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीने सुचविलेल्या सर्व शास्त्रीय उपाययोजना करूनही बिबट्या जेरबंद करण्यास यश येत नव्हते. यामुळे पश्चिम वन विभागाने अमरावती येथील विशेष रेस्क्यू पथकालाही सोमवारी सकाळी पाचारण होण्यास सांगितले. सुदैवाने बिबट्या दुपारी जेरबंद झाला.
बिबट्याचा स्वभाव अत्यंत विचित्र अन् वेगळाच
दरम्यान पिंपळदमधील बिबट्याचा स्वभाव अत्यंत विचित्र अन् वेगळाच आढळून आला. बिबट मादी दुपारी 3 ते 5 या वेळेत परिसरातील मळ्यांमध्ये सक्रिय होत होती. पिंजऱ्याजवळ जात त्यावरील पालापाचोळाही तिने अनेकदा बाजूला करून झाकलेले पिंजरे उघडेबोडके केले होते. यामुळे या बिबट्याला शूट करण्याची परवानगी सोमवारी मागण्याची तयारीही केली. बिबट्या दिसताच वन कर्मचाऱ्यांनी कौशल्याने व धाडसाने त्याच्यावर जाळी फेकून अडकवले. त्यानंतर बेशुद्ध करत अवघ्या तासाभरात ऑपरेशन वन विभागाने पूर्ण केल्याचे पश्चिम वन विभाग उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले.