Nashik Lok Adalat : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शनिवार 11 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे (Lok Adalat) आयोजन करण्यात आले आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. पक्षकारांचा वेळ व पैसे वाचावे आणि न्यायालयांवर असलेल्या खटल्यांचा ताण कमी व्हावा म्हणून, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार ही लोक अदालत होत आहे. लोकअदालतीतून वाद मिटविण्यासाठी तडजोड झाल्यास वादास कायमस्वरुपी पूर्णविराम मिळून पक्षकारांचा पैसा व वेळेची बचत होते. 


नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये होणाऱ्या लोकअदालतीसाठी प्रलंबित प्रकरणांपैकी वसूलीची प्रकरणे, फौजदारी तडजोडपात्र, विद्युत चोरी, भूसंपादन, अपघात विमा, वैवाहिक, धनादेश अनादराचे प्रकरणे, मिळकत व पाणी कर वसूलीची ग्रामपंचायत व महानगरपालिकेतील प्रकरणे असे एकूण 23 हजार प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत, महानगरपालिका, महावितरण, वेगवेगळ्या वित्तीय संस्था, बँक, दूरध्वनी थकीत रक्कम वसुलीची भारत संचार निगम व इतर खाजगी कंपन्याची प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे अशी एकूण एक लाख 33 हजार 62 दाखलपूर्व प्रकरणे नाशिक जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत निवाडा करण्यात येणार आहेत.


त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या लोकअदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी केले असल्याची माहिती, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी दिली आहे. जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालये, कामगार, कौटुंबिक, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक मंच व मोटार वाहन न्यायालय या ठिकाणी पॅनल स्थापन करण्यात आलेली आहेत, अशी माहिती इंदलकर यांनी दिली आहे.


लोक अदालत म्हणजे काय? 


लोकन्यायालय म्हणजे काय? तर एखादा वाद उद्भवला तर सामंजस्याने सोडवण्याची परंपरा आहे. आजही गावातील जुनी–जाणती माणसे एकत्र येत गावात कुठल्याही स्वरूपाचा वाद समजुतीने मिटवतात. ज्यांच्यापुढे वाद नेला जातो, ती गावातील नि:पक्षपाती लोक असत. यालाच ‘गाव-पंचायत असेही म्हटले जाते. ‘लोकन्यायालय’ म्हणजे या गाव पंचायतीचेच आधुनिक रूप म्हणून ओळखले जाते. जेथे कायद्याचा अभ्यास असणारे नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोड घडवीत असते. तसेच लोक अदालतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. दोन्ही पक्षकार लोक अदालतीमध्ये जाण्याची विनंती करतात. तेव्हा त्यांचे प्रकरण लोक अदालतीकडे पाठविले जाते. हे करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.