Ambadas Danve : सेनेतून (Shivsena) बंडखोरी करून बाहेर पडलेले आज भाजपाच्या (BJP) स्क्रिप्टवर काम करत असून मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या खदखद सुरू आहे. तर त्यातील अर्धे अधिक आमदार आताच परेशान झाले आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत नव्हे तर त्या अगोदरच शिवसेना सत्तेवर येईल. त्यामुळे शिवसेना फार काळ विरोधात बसणार नाही असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेने कार्यालयात (Nashik Shivsena Office) बैठक घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले, मला पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिले असले तरी अद्याप आपण त्या खुर्चीवर बसलेलो नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फार काळ खुर्चीवर बसायचे नाही, असा मंत्र दिल्यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगून दानवे यांनी भाजपावर टीका केली. पक्ष सोडण्यासाठी विविध कारणे बंडखोरांकडून दिली जात आहेत. तरी ज्यावेळी ते सेनेत मंत्रीपदावर होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सारे धंदे बंद केले होते. ते धंदे बंद झाल्यानेच ही मंडळी नाराज होती. आता सत्तेत गेल्यामुळे त्यांचे धंदे पुन्हा सुरू झाल्याचा आरोप दानवे यांनी केला.
ते पुढे म्हणाले आगामी काळ पक्षांसाठी संघर्षाचा असून क्रांति करण्याचा आहे. ती क्रांती करण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. पक्षातून बाहेर पडलेले गद्दार आगामी निवडणुकीत निवडून येणार नाहीत असा दावा केला. ते पुढे म्हणाले सत्तासंघर्षात न्यायालयाच्या निर्णय शिवसेनेचे बाजूनेच लागणार असून पाच खटल्यांपैकी एका खटल्याचा निकाल जरी आपल्या बाजूने लागला तरी राज्यात वेगळे चित्र दिसेल असा आशावादही अंबादास दानवे यांनी बोलून दाखवला.
यावेळी बोलताना उपनेते सुनील बागुल यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार असून पक्ष सोडून गेलेले गद्दार हे भाजपाच्या भरवशावर गेले असले तरी एक दिवस भाजपाच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवेल असा दावा केला. तर सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीशी युती केली म्हणून टीका करणारे दीपक केसरकर, उदय सामंत यांचा जन्मच राष्ट्रवादीत झाला असल्याने त्यांना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.
आंदोलन करणे हा विरोधी पक्षाचा अधिकार
आंदोलन करणे हा विरोधी पक्षाचा अधिकार असून त्यांचे कामे आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करणे शोभत नाही. विरोधी पक्षाच्या आंदोलनाला सत्ताधारी अडथळा करीत असतील तर अंगावर धावून येणाऱ्या सत्ताधाऱ्यांची मस्ती महाराष्ट्र बघतो आहे, ही मस्ती महाराष्ट्र लवकरच जिरवेल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. अंबादास दानवे हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांचा शिवसेना कार्यालयात सन्मान करण्यात आला.