Nashik News : अन्न व औषध प्रशासन (Food And Drugs Department) विभागाने सण उत्सवाच्या दृष्टीने भेसळयुक्त अन्नपदार्थांविषयी (Adulterated food) मोहीम सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल उत्पादक व रिपेकर घाऊक विक्रेते यांच्यावर प्रशासनामार्फत नाशिक (Nashik) जिल्ह्यात कारवाई करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अन्नसुरक्षा अधिकारी पी एस पाटील यांच्यासह पथकाने नाशिक शहरातील मधुर डेअरी अँड डेली नीड्स अंबड या आस्थापनेवर धाड टाकली आहे.


यंदा कोरोनाचे (Corona) निर्बंध शिथिल झाल्याने सण उत्सव जोरात साजरे होत आहेत. या सण उत्सवात गोड खाद्यपदार्थांना मागणी वाढली असून इतर तेलात केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना मागणी असते. मात्र अनेकदा भेसळयुक्त खाद्यपदार्थ बाजारात विक्रीसाठी ठेवले जातात. या सर्वांना आळा घालण्यासाठी नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाकडून धडक मोहीम हातात घेण्यात आली आहे. या माध्यमातून शहरातील भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्या तसेच खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या विरुद्ध कारवाई मोहीम सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच एक कोटी रुपयांच्या आसपास खाद्यतेलाची डबे जप्त  करण्यात आले होते. 


दरम्यान अंबड (Ambad) येथील दूध डेअरी फार्म (Milk Dairy Farm) येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. यावेळी आप्पासाहेब कारभारी घुले आस्थापनेचा विक्रेता म्हणून हजर होता. या आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाच्या विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे आढळले. सदर पनीर व रिफाइंड पामोलीन तेलाचा वापर करून बनावट रित्या करताना आढळले. 


सदर कारखान्यात तयार झालेले पनीर व तूप हे अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 मध्ये नमूद तरतुदीनुसार तयार केले जात नाहीत. या संशयांवरून विक्रेता घुले यांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कोणताही वैद्य परवाना त्याच्या उत्पादनाच्या जागेसाठी धारण केलेला नसल्यामुळे विक्रेता घुले यांच्याकडील पनीर ऍसिटिक ऍसिड रिफाइंड पामोलीन तेल आणि तूप यांचा एकूण दोन लाख 35 हजार 796 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.


म्हसरूळ परिसरात दुसरी कारवाई 
तसेच वैध परवाना धारण केलेल्या शिवाय अन्न व्यवसाय न करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाने नाशिक येथील आनंद डेअरी फार्म म्हसरूळ या आस्थापनेवर देखील धाड टाकली असून विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावट दूध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून उत्पादित केलेले असल्याचे आढळले. त्या ठिकाणी दूध पावडर, रिफाइंड पामतेलाचा साठा उपलब्ध असल्याने सदरचे पनीरचा नमुना तसेच भेसळयुक्त पदार्थ यांचे नमुने घेऊन त्यांचा एकूण नऊ लाख 67 हजार 315 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरचे दोन्ही कारखाने सील करण्यात आले आहेत.