Nashik Open University : मुक्त शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या नाशिकच्या (Nashik) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या (Oepn University) अंतर्गत येणारे काही अभ्यास केंद्र (Study Center) बंद करण्यात आले आहेत. मात्र याला पर्याय म्हणून मुक्त विद्यापीठाने संबंधित अभ्यास केंद्र इतर अभ्यास केंद्रात वर्ग केल्याने विदयार्थ्यांना अडचण येणार नसल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. इतर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठातून सुमारे 350 हुन अधिक अभ्याक्रमांना पसंती देऊन शिक्षण पूर्ण करता येते. यासाठी मुक्त विद्यापीठाकडून अभ्यास केंद्र निवडण्यात येते. मात्र कालांतराने यात बदल होऊन नव्या अभ्यासकेंद्राची निवड केली जाते.
नाशिकमध्ये मुक्त विद्यापीठाचे आठ विभागीय अभ्यास केंद्र असून सध्या युजीसीच्या नियमानुसार यातील काही अभ्यास केंद्र बंद करण्यात आले आहे. मात्र संबंधित अभ्यास केंद्रातील विदयार्थ्यांना इतर अभ्यास केंद्रात सहभागी केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे मुक्त विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. युजीसीच्या अंतर्गत भारतातील 14 मुक्त विद्यापीठांसाठी अभ्यास केंद्र बंदचे पत्र पाठविण्यात आले असून या अभ्यास केंद्रांना इतर अभ्यास केंद्रात समाविष्ट करण्यात येणार आहे. मुक्त विद्यापिठात ज्युनिअर पर्यत अभ्यास केंद्रांना परवानगी असल्याने पुढील अभ्यास क्रमांसाठी वेळोवेळी अशा पद्धतीने बदल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुक्त विद्यापीठांतर्गत येणारे काही अभ्यास केंद्र युजीसी कडून बंद करण्यात आले असून अभ्यास केंद्र सुरू करण्याबाबत शहरातील इतर महाविद्यालयात चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव - डाॅ. प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान मुक्त विद्यापिठाच्या माध्यमातून एकही अभ्यासक्रम बंद करण्यात आला नसून युजीसीकडून नेहमीप्रमाणे केंद्र वर्ग करण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. हे शैक्षणिक क्षेत्रातील दैनंदिन कामकाजाचा भाग असल्याचे मुक्त विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी दत्ता पाटील यांनी सांगितले.
अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु
दरम्यान मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून पुढील काळात नव्याने अभ्यासक्रमांना मान्यता मिळणार आहे. सध्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखेतील पत्रकारिता व जन संज्ञापन, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील बँकिंग, सहकार व्यवस्थापन, ट्रॅव्हल अँड टुरिझम, वास्तुकला, विज्ञान व तंत्रज्ञान शाखा, आरोग्य विज्ञान, शिक्षण, संगणक शास्त्र, निरंतर शिक्षण, शैक्षणिक सेवा व सहयोग व विशेष उपक्रम केंद्र आदी शाखांच्या अंतर्गत अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.