Nashik Old Age Home : वृद्धाश्रम (Old Age Home) ओस पडला हे खरंतर सशक्त समाजाचे लक्षण, पण आज वृद्धाश्रम ओसंडून वाहू लागलेत आणि एक समाज म्हणून हेच आपलं दुर्दैव आहे. कोरोनानंतर (Corona) नाशिकची (Nashik) वृद्धाश्रमे फुल्ल झाल्याचं एक धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये समोर आलं असून अनेक ज्येष्ठ मंडळी भरतीसाठी वेटिंगवरही आहेत. कोरोनामुळे कुटुंबात वाढलेले कलह, आजारपण आणि कोलमडलेली आर्थिक परिस्थिती हे यामागील मुख्य कारण आहेत. 


बाळाचा जन्म झाला, घरात नवा पाहुणा आला की आई वडीलांकडून हा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आई वडीलांचा बोट धरत मुलगा हळू हळू मोठा होत जातो, अगदी शाळेत ऍडमिशन घेण्यापासून ते मुलाचे लग्न झाल्यावरही आई वडील त्याची काळजी घेतात. मुलगा आनंदी राहावा, त्याच्या सर्व ईच्छा - स्वप्न पूर्ण व्हावेत म्हणून ते आयुष्यभर झगडतात मात्र हेच आई वडील जेव्हा वयाची साठी ओलांडतात तेव्हा आयुष्यातील शेवटचे दिवस मुलांसोबत, नातवंडांसोबत आनंदाने जावेत अशी त्यांची अपेक्षा असते. म्हातारपण हे जणू दुसरे बालपणच असते त्यामुळे मुलांनी आपला सांभाळ करावा, काळजी घ्यावी अशी त्यांची ईच्छा असते मात्र सध्याचं जग हे बदलत चाललय. आई वडीलांना आश्रय देण्यास मुलं नकार देत असल्याने मोठं मोठ्या शहरांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागलीय त्यातच कोरोनानंतर तर वृद्धाश्रमे चक्क फुल्ल झाली असून अनेक ज्येष्ठ मंडळी भरतीसाठी वेटिंगवर असल्याच धक्कादायक वास्तव नाशिकसारख्या धार्मिक शहरात समोर आलय विशेष म्हणजे श्रीमंत घरातील मंडळी यात अधिक आहेत.


हिरावाडी परिसरातील वात्सल्य वृद्धाश्रमात सध्या 60 ज्येष्ठ मंडळी असून हे वृद्धाश्रमच त्यांचे घर बनले आहे. आश्रमात आजी आजोबांची एकमेकांशी घट्ट मैत्री जमलीय, ईथे ते वेगवेगळे खेळ खेळतात, सोबत जेवण करतात आणि एकमेकांची काळजीही घेतात. या प्रत्येकाची एक अनोखी कहाणी आहे. एक आजोबा पश्चिम महाराष्ट्रात आमदार होते, दुसरे आजोबा हे उत्तर महाराष्ट्रात तहसीलदार होते. या दोघांप्रमाणेच कोणी मुख्याध्यापक, कंपनीत मॅनेजर, सरकारी कारकून म्हणून कार्यरत होते तर दोन आजी या शिक्षिकाही होत्या. मात्र या सगळ्यांनी जेव्हा वयाची साठी ओलांडली. तेव्हा हेच आई वडील मुलांना ओझे वाटू लागले. त्यामुळे काहींनी स्वतःहून घर सोडले तर बाकीच्यांची घर सोडण्याची ईच्छा नसतांनाही त्यांना ईथे यावं लागलं.  


ज्यांनी तुमच्यासाठी आयुष्य घालवल त्यांना अशी वागणूक देणं चुकीचे आहे. त्यांची काळजी घेणं मुलांचे कर्तव्य, शेवटचे दिवस चांगले जातील.हल्लीच्या काळात म्हातारी सासू सुनेला नको असते. मुलांना त्यांच्या घरी सुखी राहूदे पण आम्ही ईथे खुश आहोत, घरचा फोन आला तरी जास्त बोलत नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया इथल्या आजीबाईंनी दिली. चिंताजनक बाब म्हणजे यातील 40 टक्के आजी आजोबा हे कोरोना नंतर वृद्धाश्रमात आले आहेत. कोरोनामुळे कुटुंबात वाढलेले कलह, आजारपण आणि कोलमडलेली आर्थिक परिस्थिती हे यामागील मुख्य कारण असल्याचं समोर आले आहे. 


वृद्धाश्रम संचालक सतीश सोनार म्हणाले कि कोरोनानंतर गर्दी वाढली, कोरोना काळातही अनेक लोकांकडून चौकशी करण्यात येत होती. दरम्यान वृद्धाश्रमातील संख्या वाढल्याने दुसरी शाखा काढणे क्रमप्राप्त ठरले. आधी 65 होते, आता शंभर झाले. संपत्ती वाद, लोकं मॉडर्न झाल्याने म्हातारी मंडळी नको असतात. इथे राहण्याची, खाण्याची, मेडिकल सर्व सुविधा त्यांना देतो. अनेक जणांचे मुलं पैसेही देतात, सांभाळ करण्यासाठी. कोरोना नंतर जे आले त्यामागे कारण घरातील कलह, आजारपण वाढल्याने त्यांना सांभाळणे अवघड जाते, आर्थिक संकट कोसळल्याने अडचणीत आल्याचे ते म्हणाले. 


अशी आहे सद्यस्थिती 
कोरोनापूर्वी मातोश्री वृद्धाश्रमातली वृद्धांची संख्या 55 होती आता ती 75 झाली. वात्सल्य वृद्धाश्रमातली संख्या 65 होती आता ती 100 झाली. सुखाश्रय वृद्धाश्रमातही पूर्वी दहा असलेली संख्या आता 22 वर्गीय याशिवाय नागजी शेठ डोंगरगाव येथे 40 दिलासा वृद्धाश्रमात 55, मानसेवा वृद्धाश्रमात 76 आणि प्रेमांगण वृद्धाश्रमात दहा इतकी वृद्धांची संख्या आहे. म्हणजे कोरोना नंतर सुमारे 40 टक्क्यांनी या संख्येत वाढ झाली आहे.