Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party-NCP ) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल घेतलेल्या राजकारणातून निवृत्त होत असल्याचा घेतलेला निर्णय जाहीर केला आणि राजकारणात मोठा भूकंप झाला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निर्णय मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने शरद पवार यांची महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad Pawar) यांनी काल पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अचानक राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. शरद पवार यांनी टाकलेल्या राजकीय बाँम्बनंतर राज्यासह देशाच्या राजकारणात हादरे बसले आहेत. त्याचबरोबर इतर पक्षांतील नेत्यांना देखील धक्का बसला आहे. यावर इतर पक्षातील नेते बोलण्यास तयार नसल्याचे दिसून येत असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणाला शरद पवार यांची गरज असल्याचे नेते म्हणत आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या निर्णयानंतर नाशिकचे शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 


सुहास कांदे म्हणाले कि, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लाभलेले उत्तुंग असं व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील देव म्हटलं तर त्यात वावग ठरणार नाही. अशा व्यक्तीची आज महाराष्ट्राला गरज आहे. परंतु जर त्यांनी निवृत्ती घेतली तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव असेल. मी जनतेच्या वतीने शरद पवार यांना विनंती करतो की 'आपली महाराष्ट्राला, देशाला गरज आहे. त्यामुळे आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ नये, शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही राजकारण करत आलो आहे. सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाने देशाच्या राजकारणात मोठे पाऊल टाकले. 


पवारांना पाहून राजकारणात पाऊल ... 


ते पुढे म्हणाले कि, आज महाराष्ट्रासह देशाचे नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पहिले जाते. शरद पवार यांना पाहूनच आम्ही राजकारणात आलो, असल्याचे कांदे म्हणाले. शरद पवार यांनी जर निवृत्ती घेतली तर याचं पुढचं राजकारण हे खरंतर सांगता येणार नाही. तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. यावर ते निर्णय घेतील असेही ते म्हणाले. दरम्यान शरद पवार यांच्या निर्णयानंतर नेत्यांसह कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अनेक राजकीय नेते, पदाधिकारी, आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी शरद पवारांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत या राजकीय भूकंपाचा परिणाम दिसून येईल असे वाटते.