Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत (National Tuberculosis Eradication Campaign) 8 मार्च ते 21 मार्च या कालावधीत जिल्ह्यातील सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करणार असून नागरिकांनी आजाराची माहिती न लपवता ती सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान केंद्र सरकारने याबाबत महत्वाचे पाऊल उचलले असून सन 2025 पर्यंत क्षयमुक्त भारत करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) अनेक भागात राष्ट्रीय क्षयरोग (Tuberculosis) दुरीकरण मोहीम राबविण्यात सुरवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत ग्रामीण शहरी भागातील अति जोखमीच्या घरांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्र व 592 उपकेंद्र येथून सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या मोहिमेचे सहनियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. या मोहिमेत 4 लाख 59 हजार 492 नागरिकांचे घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे डॉ रवींद्र चौधरी जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी सांगितले.
क्षयरोग हा बरा होणारा रोग आहे. यासाठी दोन आठवड्यापेक्षा सतत ताप व खोकला (Cough) असेल तर दोन वेळा थुंकी तपासून घ्यावी. नियमित औषधोपचार व संपूर्ण कालावधीचा सहा ते आठ महिने औषधी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्वेक्षणात दोन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला असणे दोन आठवड्यापासून येणारा ताप वजनात घट, भूक न लागणे मानेवर व इतरत्र गाठी येणे यास इतर लक्षणाची माहिती घेतली जाणार आहे. ज्यांना ही लक्षणे आढळतील, त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाधरन डी व नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी केले.
विविध स्पर्धांचे आयोजन
दरम्यान या आजाराचे निदान झाले तर त्यांना डॉट्स औषधी सुरू केली जाणार आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन 24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात करण्यात येणार आहे. क्षयरोग जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, आरोग्य क्षयरोग जनजागृती मेळावा, पथनाट्य आदी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणीव जागृती निर्माण केली जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी माहिती दिली.
टीबी मुक्त भारत करण्याचा संकल्प
अभियानाअंतर्गत उपचारावर असणाऱ्या व पोषण आहार कीट घेण्यासाठी संमती तर असलेल्या शहर रुग्णांना पोषण आहाराच्या किडचे वाटप केले जाणार आहे. सर्वेक्षणादरम्यान नागरिकांनी आवश्यक ती माहिती अशांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावी, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली.