Dindori Earthquake : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी परिसरात (Dindori Area) पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य (Earthquake) धक्के बसले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चार दिवसापूर्वीच दिंडोरी (Dindori) तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे (Earthquake) तीन धक्के बसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले होते. रविवारी रात्री पुन्हा या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आदी भागांतही जुलै महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील काही गावे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. परिणामी दुसर्यांबद्द भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 


दिंडोरी शहरात रविवार 21 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के बसले. यामध्ये रात्री 10 वाजून 06 मिनिटांनी पहिला तर 10 वाजून 15 मिनिटांनी दुसरा धक्का बसला. नागरिक झोपेच्या तयारीत असतानाच हा धक्का जाणवल्यानंतर नागरिक घराबाहेर आले. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर काहीतरी आवाज होऊन जमिनीला हादरे बसल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीच्या धक्क्यांमध्ये परिसरात सर्वात जास्त हादरे जांबुटके गावात असले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


नागरिकांनी घाबरुन जाऊ नये!
दिंडोरी तालुक्यात विविध गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून याबाबत मेरी येथील संशोधन केंद्रात त्याबाबत कोणतीही नोंद नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कळतेचार ते पाच दिवसांच्या फरकाने धक्के जाणवल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहे. याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरुन जाऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.


नेमके कारण काय? 
पृथ्वीच्या भूगर्भात टेक्टॉनिक प्लेट्सच्या तणावामुळे दाब मुक्त होण्यासाठी होणाऱ्या हालचाली आणि एकमेकांवर घर्षणाने भूकंप होतात. जगभरात भूकंप मापन केंद्र दरवर्षी भूकंपाचे साधारण 20 हजार झटके नोंदवते. धरणातील पाण्याच्या दबावाने देखील कोयनासारख्या धरण परिसरात भूकंप होतात. भूकंप ही टाळता न येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.


जिल्हा प्रशासन अलर्ट 
मेरी भूकंपमापन 16 ते 20 किलोमीटर अंतरावरील गावांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील आठवड्यात बुधवारी दिंडोरी परिसरात तीन धक्के जाणवले होते. काल रात्रीच्या सुमारास पुन्हा दोन धक्के जाणवले आहेत. दरम्यान पहिल्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट झाले होते. त्यानुसार प्रशासनाने संबंधित गावात जाऊन तपासणी मोहीम केल्याचे समजते.