Kasara Ghat Accident : नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंट जवळ पहाटेच्या वेळेस मोठा अपघात झाला आहे.  केळ्याने भरलेल्या ट्रकने आयशरला मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाला असून ट्रक खाली पडल्याने चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते. 


आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल


या अपघातानंतर ट्रक मधील केळ्यांचे ट्रे महामार्गावर अस्ताव्यस्त पडले होते. पप्पू यादव असे मयत ट्रक चालकाचे नाव असून आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रकचालकाचा मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.


काही काळ वाहतूक विस्कळित


अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या अपघाती ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. कसारा घाटात झालेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघात झालेल्या ठिकाणावरून एकाच लेनमधून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. तर मागून येणाऱ्या वाहनांचा खोळंबा होऊन मोठी कोंडी झाली होती. 


यंत्रणा बदलणं गरजेचं आहे - फडणवीस 


सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरु आहे. आज विधानसभेत वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघाताची सरकारने चौकशी लावली आहे, असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी सरकार यावर काय उपाययोजना करणार असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं की, चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटे यांचा अपघात झाला. मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती दिली. यंत्रणा बदलणं गरजेचं आहे. अपघाताचं लोकेशन न कळल्यानं मदत पोहोचायला उशीर झाला, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन मांडताना म्हटलं आहे.


विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर रस्ते सुरक्षा मुद्दा अधिवेशनात 


देशात दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी मुंबईत एका कार्यक्रमात दिली. गडकरी म्हणाले, "एका सविस्तर अहवालात (DPR) देशात दरवर्षी 1.50 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावत असल्याचे समोर आले आहे." दरम्यान विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर रस्ते सुरक्षा हा मुद्दा जोर धरू लागला. दरम्यान आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी या मुद्द्यावरून हंगामा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.


"दरवर्षी पाच लाखांहून अधिक रस्ते अपघात" - नितीन गडकरी
मुंबईत सिविल इंजिनिअर्सच्या राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. नितीन गडकरी यांनी दावा केला की, "देशात दरवर्षी पाच लाखांहून अधिक रस्ते अपघात होतात, ज्यात दीड लाखांहून अधिक लोक आपला जीव गमावतात. सल्लागारांच्या अहवालात हे स्पष्ट आहे की, लोकांनी केलेल्या चुकांमुळेच मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


काळ्या अन् पांढऱ्या दाढीवाल्यांवरुन भुजबळांची टोलेबाजी! विधानसभेत फडणवीसांसोबत रंगली जुगलबंदी 


आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक; अजित पवारांची फुल बॅटिंग