Nashik Crime : नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यातील विविध भागांतील अवैध धंद्यावर (Illegals)  धडक कारवाई सुरु आहे. गेल्या 40 दिवसातच तब्बल 749 गुन्हे दाखल करण्यात येऊन 852 संशयितांना अटक करण्यात आलीय तर एकूण 87 लाख 13 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


नाशिक ग्रामीण पोलिस (Nashik Police) अधिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्याविरोधात जोरदार कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासुन जिल्ह्यातील अनेक भागात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध भागात पथके कार्यान्वित करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून दररोज जिल्ह्यात कारवाया करण्यात येत आहेत. अवैध धंद्यांविरोधात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरु केलेली कारवाई सध्या चांगलीच चर्चेची विषय ठरत आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी धडक मोहीम सुरु केली असून गेल्या 40 दिवसातच तब्बल 749 गुन्हे दाखल करण्यात येऊन 852 संशयितांना अटक करण्यात आली तर एकूण 87 लाख 13 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने गर्मी पोलिसांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. 


दरम्यान पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पोलिस ठाणेनिहाय निरीक्षकांची पथके व स्थानिक गुन्हे शाखांची पथके रात्रदिवस कार्यरत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे व पथकनिहाय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यामुळे ग्रामीण भागात अवैध धंदेचालक, जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अवैध दारू विक्री, जुगार, अवैध वाळू, अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिन्याभरात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून, महामार्गावरील हॉटेल-ढाबे तपासणीसहित गावस्तरावरील अवैध अड्डे उद्धवस्त करण्यात आले आहेत.  मागील चाळीस दिवसांत आतापर्यंत 749 गुन्ह्यांमध्ये दारूबंदीचे सर्वाधिक 619 त्याखालोखाल जुगाराचे 112, गुटख्याचे 6, गांजा बाळगल्याप्रकरणी 4, अवैध शस्त्रांच्या 7 गुन्ह्यांचा समावेश असून रात्री साडेदहा नंतर जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


तक्रारीसाठी संपर्क क्रमांक 
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू आहे. कारवाईस टाळाटाळ केल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर देखिल कारवाई केली जाणार असून अवैध धंद्याबाबत ग्रामीण पोलिसांकडून नागरिकांसाठी 6262256363 हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येऊन माहिती देणाऱ्याचे नावही गुपित ठेवले जाणार आहे.