Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यातच ड्रायव्हिंग स्कुलचे पेवही फुटले आहेत. त्यामुळे अनेकदा गाडी शिकत असताना देखील अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. गंगापूररोड (Gangapur Road) वरील कवडे गार्डन परिसरात महिला पोलीस गाडी शिकत असताना दुचाकीला (Accident) धडक दिल्याची घटना घडली आहे. 


नाशिकमध्ये रस्ते अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांची, मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे शहरात मोटार वाहन प्रशिक्षण संस्था देखील भरमसाठ झाल्या आहेत. सकाळी किंवा सायंकाळच्या सुमारास मित्र ड्रायव्हिंग स्कुलची वाहने वर्दळीच्या रस्त्यावर प्रशिक्षणार्थीस गाडी चालविण्याचे प्रशिक्षण देताना दिसून येतात. अशातच सकाळी कामावर जाणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्याने अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागते. नाशिक शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या गंगापूर रोडवर चालक गाडी शिकत आहे हे असलेल्या वाहनाने कामावर जाणाऱ्या दुचाकीस्वारांस धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीवरील दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. 


गंगापूर रोडवरील कवडे गार्डनजवळ ही घटना घडली. गंगापूरकडून नाशिककडे येणारी दुचाकी व नाशिककडून गंगापूरकडे जाणारी पोलीस गाडी यांच्यात हा अपघात झाला. यावेळी पोलीस वाहन हे प्रशिक्षणार्थी वाहन होते. हे गंगापूरकडे जात असतांना कवडे गार्डन जवळ बालाजी मंदिराकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक दिली. यात देवरगाव येथील दोन दुचाकीस्वार हे नाशिककडे कामावर निघाले होते. या अपघातात दोघांना हातापायास दुखापत झाली असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी होऊन अनेकांनी रस्त्यातच दुचाकी पार्क केल्याचे चित्र दिसून आले. 


Nashik News | नाशिक- गंगापूर गिरणारे-हरसूल अपघातांचा मार्ग


नाशिक- गंगापूर गिरणारे-हरसूल हा मार्ग अपघातांचा मार्ग बनला आहे. दर दोन दिवसाआड या रस्त्यावर अपघात होत असून गंगापूरच्या पुढे गिरणारे गाव सोडल्यानंतर अनेक भागात खड्डे असून रात्रीच्या अंधारात न दिसणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघात नित्याचे झाले आहेत. तसेच या मार्गावरून येणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने त्याचबरोबर गिरणारे, देवरगाव, धोंडेगाव आदी परिसरातून मजुरीसाठी अनेक तरुण नाशिकला येत असतात. मात्र खड्डे आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे इतर वाहनधारकांमध्ये नेहमीच धडकी भरलेली असते. यामुळे सावधगिरीने वाहन चालविताना देखील अनेकदा दुसरे वाहन कधी येऊन धडक देईल हि भीती नेहमीच असल्याने या ठिकाणी पोलिसांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.