Nashik Shivsena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असल्याची माहिती आहे. यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत 6 आणि 7 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते सभेची स्थान निश्चिती आणि पदाधिकारी आढावा घेणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाची तोफ नाशिकमध्ये धडकणार हे निश्चित आहे. 


दरम्यान सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटाला नाशिकमधूनच पहिला धक्का बसला होता. त्यानंतर ठाकरे गटातील निकटवर्तीय आणि जवळच्या शिवसैनिकांनी ठाकरे राम राम ठोकला. या डॅमेज कंट्रोलसाठी वेळोवेळी संजय राऊतांनी दौरा केला. मात्र डॅमेज कंट्रोल होण्याऐवजी नेते शिंदे गटात पसार झाले. मात्र आता थेट शिवसेना नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे समजते आहे. तर मागील महिन्यात शिवसेनेला जोरदार धक्के बसल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा नाशिक दौरा झाला होता. त्यानंतर राऊतांचे निकटवर्तीय असलेल्या संपर्क प्रमुख भाऊ चौधरीसह माजी आमदार, माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश  केला. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाला स्थेर्य देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत. 


आगामी काळात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकत असल्याने आता त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तातडीने तयारीला लागण्याचे ठरवले आहे. नाशिकमध्ये या संदर्भात रणसिंग फुंकून फुटीरांचा समाचार घेण्यासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच नाशिक मध्ये येणार आहेत. जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असल्याचे समजते आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ठाकरे गटाच्या कोअर कमिटीला पाचारण करण्यात आले होते. यावेळी काही विषयांवर चर्चा करत येत्या महिनाभरात जाहीर सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले.


नाशिकमधून ठाकरे गटाला मोठमोठे धक्के बसत गेले. यामध्ये दोन आमदार, एक खासदार, काही माजी खासदार आणि शहरातील 12 माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी शिंदे गटात गेले. त्याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला आणि महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकत असल्याने शहरात बूथ प्रमुख, गटप्रमुख नियुक्तीचे काम पूर्ण करावे. तसेच काही पदाधिकारी नियुक्ती करायचे असेल तर सुकाणू समितीने एकत्रितपणे निर्णय घेऊन तो कळवावा असे आवाहन त्यांनी केले. 


संपर्क प्रमुखपदी कोण? 
भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर ठाकरे गटाचे नवीन संपर्कप्रमुख कोण? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नाशिकला ठाकरे गटाचा संपर्क प्रमुख कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहे. नाशिकचे जिल्हा संपर्क प्रमुख पद अरविंद सावंत यांच्यापासून रवींद्र मिर्लेकर, अजय चौधरी अशा अनेकांनी भूषवले आहे. मात्र खासदार संजय राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख पद आल्यानंतर त्यांनी आपले विश्वासू सहकारी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती केली होती. मात्र गेल्या महिन्यात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे. त्यांच्या जागी कोण नियुक्त होणार अशा चर्चा सध्या रंगू लागल्या असून अनेक नावांची देखील चर्चा होऊ लागली आहे.