Nandurbar News : नाशिकबरोबर (Nashik) विभागातील इतर जिल्ह्यातही लाचखोरीच्या (Bribe) घटना सातत्याने समोर येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा मासा एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तब्बल साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना कार्यकारी अभियंत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये सध्या भ्रष्टाचाराची कीड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे. हे सातत्याने लाचखोरीच्या घटनांनी अधोरेखित होत आहे. नाशिकमध्ये तर टक्केवारीला उधाण आले आहे. दर एक दिवसाआड लाचखोरीचं एक प्रकरण समोर येत आहे. अशातच नंदुरबारमधील (Nandurbar) सार्वजनिक विभागात एसीबीचा ट्रॅप यशस्वी झाला आहे. लाचखोर महेश पाटील (Mahesh Patil) हा सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे. तर तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. तक्रारदाराने मागील सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची आणि डागडुगीची कामे पूर्ण केली आहेत.
तीन कामांच्या कार्यारंभ आदेशासाठी लाचेची मागणी
तसेच सध्याच्या कालावधीत तक्रारदाराच्या तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे या कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा या कार्यालयात आले आहेत. परंतु नमूद तिन्ही कामांचे कार्यारंभ आदेश आजपर्यंत तक्रारदाराला मिळालेले नाहीत. तक्रारदाराने पूर्ण केलेल्या कामांबाबतची तीन कोटी 92 लाख 79 हजार 285 रुपये एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे आणि याव्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या तीन कामांचे पाच कोटी 33 लाख रुपये एवढ्या रकमेचे कार्यारंभ आदेश मिळण्यासाठी कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील याच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. अनेक वेळा विनंती केली. परंतु महेश पाटीलने बिलाची रक्कम मंजूर केली नाही.
43 लाख रुपयांची लाच मागितली
तसेच कार्यारंभ आदेश सुद्धा दिले नाहीत. यानंतर तक्रारदाराने महेश पाटीलला विनंती आणि पाठपुरावा केला. तक्रारदराने पूर्ण केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी वेळोवेळी 10 टक्के आणि तिन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी 0.75 टक्के ते 1 अशा टक्केवारीच्या स्वरुपात एकत्रित 43 लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची मागणी केली. अखेर या प्रकरणी संबंधित ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी 3 लाख 50 हजार रुपये अशी रक्कम लाचखोर महेश पाटील यांना त्यांच्या शहादा येथील शासकीय निवासस्थानी स्वीकारली.