Nitin Gadkari : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सार्वजनिक मंत्री असताना नाशिक-मुंबई महामार्ग (Nashik Mumbai Highway) सहा पदरी झाला असता, मात्र त्यावेळी टोल दुसऱ्याला दिल्यामुळे आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र लवकरच हा मार्ग सहा पदरी करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे.
इगतपुरी (Igatpuri) येथील गोंदे ते प्रिंपीसदो फाटा या महामार्गाच्या उदघाटनासाठी ते आले होते. या उदघाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. जिथे जिथे एक्सीडेंट होतात आहेत, त्या ब्लॅक स्पॉटचा वार्षिक आराखड्यात समावेश करून ताबडतोब सुधारणा करण्यात येईल. लोकांचे प्राण वाचवण्याचं काम अग्रक्रमाने केले पाहिजे, असं ध्येय आहे. त्यानुसार सगळ्यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्याला अपघात मुक्त करू अशी भावना यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली. यावेळी गडकरी यांनी छगन भुजबळांवर जोरदार टिका करत नाशिक सिन्नर महामार्गावरील रस्त्यांची रचना, ईतर चुकांना छगन भुजबळ जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
गडकरी पुढे म्हणाले, नाशिकच्या (Nashik) फ्लावर पार्कच्या उदघाटनासाठी आलो होतो, त्यावेळी कॉलेजमध्यल्या पाच मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजली. ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली अस म्हणत नाशिकच्या वाढत्या अपघातांबाबत व्यक्त चिंता केली. तर दुसरीकडे नाशिक मुंबई रोडच्या बाबतीत डिझायनिंगमध्ये बऱ्याच चुका झालेल्या आहेत. यावेळी काही राजकीयदृष्ट्या बोलायचं नाही. मात्र नाशिकच्या रस्त्यामध्ये हा जरी राष्ट्रीय महामार्ग होता, तेव्हा सार्वजनिक बांधकाम भुजबळ मंत्री म्हणून होते, त्याच वेळी सहा लेन मार्ग केला असता तर अडचण आली नसती. त्यावेळी टोल दुसऱ्याला दिला. टोलची मुदत 2026 पर्यंत आहे, त्याची NOC घेतल्याशिवाय काम करता येणार नाही आता एनओसी घेणं मोठी अडचण असून एनओसी कसा मिळाला किंवा कसा मिळवायचा आहे, याची अडचण आहे.
शिवाय भुजबळ यांनी ज्यावेळी महामार्ग बांधला होता, तेव्हाच तो प्रॉब्लेम होता. अर्थात भुजबळांना दोष देत नाही, पण मधल्या काळात त्यांनी बरेच वक्तव्य केली होती. भुजबळ आज असते तर बरं झालं असतं पण तरीपण त्यांच्या मनातली भावना आहे, की रोड झाला पाहिजे, तसेच सहमत आहे, जुनं काही झालं असलं तरी त्या बाबतीत कुठलेही राजकारण करायचं नाही आहे, त्यामुळे नाशिककरांना सुखकर प्रवास होण्यासाठी मुंबई नाशिक महामार्ग सहा पदरी होईल, अशी ग्वाही यावेळी गडकरी यांनी दिली.
ड्रायपोर्टचा प्रकल्प माझ्या जवळचा...
नाशिकमध्ये होत असलेला ड्रायपोर्टचा प्रकल्प माझ्याजवळचा असून यामुळे नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. चांगल्या रस्त्यांमुळे प्रगती आणि विकासाच्या गती पण वाढणार आहे. द्राक्ष, कांदा, त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल या सगळ्यांचे एक्सपोर्ट नाशिक येथून होईल, नाशिक हे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणाऱ्या देशातला एक सगळ्यात मोठे सेंटर व्हावं. नाशिकमधील रोड रेल्वे आणि अविएशन याचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये एक्स्पोर्ट इम्पोर्टमध्ये नाशिक हा नंबर एकचा जिल्हा बनेल, आणि नाशिकला बनवण्याचा प्रयत्न करू असा विश्वास यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.