Nashik Satyajeet Tambe : उमेदवारी अर्ज दाखल करताना इंडियन नॅशनल काँग्रेस (Congress) म्हणूनच फॉर्म भरला. मात्र वेळेवर फॉर्म सबमिट होऊ न शकल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्जात रूपांतर झाल्याचे महत्वाचे विधान सत्यजीत तांबे (satyajeet tambe) यांनी केले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावरून राजकारण चांगलंच तापल्याचे दिसून आले. 


आज नाशिक (Nashik) पदवीधरच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया सुरु आहे. याच दरम्यान सत्यजीत तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केले आहे. सत्यजीत तांबे म्हणाले की, उमेदवारी अर्ज दाखल करताना इंडियन नॅशनल काँग्रेसचाच फॉर्म भरलेला आहे. तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म जोडू शकलो नाही. म्हणून उमेदवारी अर्ज अपक्षात कन्व्हर्ट झालेला आहे. आपण जे अर्धसत्य सातत्याने दाखवत आहात की मी अपक्ष उमेदवारी दाखल केली. ते चुकीचं आहे. फॉर्म भरताना इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणूनच फॉर्म भरला. मात्र वेळेवर फॉर्म सबमिट होऊ न शकल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. 
 
सत्यजीत तांबे पुढे म्हणाले कि, काँग्रेसकडून कुठलेही आरोप झाले नाही, काँग्रेसमधील (Congress) लोकांकडून झाले. तांबे यांच्या अपक्ष उमेदवारी बाबत बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय? त्यावर तांबे म्हणाले की, ते आजारी असून त्यांच्या खांद्यावर ऑपरेशन झालेलं आहे. त्यांच्या खांद्याला तीन फ्रॅक्चर होते. त्या फ्रॅक्चरमध्ये वायर टाकून त्याठिकाणी ऑपरेशन झालेलं आहे. ते घरात बसून आहेत कारण त्यांना हालचाल करता येत नाही. त्या परिस्थितीमध्ये सहा आठवडे झाले. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला, जे व्यक्ती आधीच दुःखातून जात आहे. त्यांना त्रास होत आहे, त्यांना त्रास देण्याची गरज नाही, ते आमचे कुटुंबप्रमुख आहे. बाळासाहेब थोरात हे आमचे कुटूंबप्रमुख असून योग्य वेळ आल्यावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.  


तसेच अपक्ष उमेदवारी दाखल करण्यावर सत्यजीत तांबे म्हणाले, पदवीधरच्या निवडणुकीचा नियम असं सांगतो की,  वेळेत फॉर्म भरला तरच पक्ष उमेदवारी ग्राह्य धरली जाते. अर्ज दाखल करताना इंडियन नॅशनल काँग्रेसचाच फॉर्म भरला. पण मी तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म जोडू न शकल्यामुळे तो अपक्ष झाला. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. आतापर्यंत हे सत्य बाहेर आलेच नाही, त्यामुळे हे पूर्ण सत्य नसून अर्ध सत्य आहे. त्याच्यावर पूर्ण सत्य लवकरच सांगेन. तेव्हा लोक चकीत होतील. राजकारणातली योग्य वेळ कधी येईल ते सांगता येत नाही असं सत्यजित तांबे यावेळी म्हणाले. 


अर्धसत्य बाजूला ठेऊन एकच बाजू मांडली गेली... 


तसेच माझी अपक्ष उमेदवारी नव्हतीच, अर्ज दाखल करताना फॉर्म काँग्रेस पक्षाचाच भरला होता, मात्र 3 वाजेपर्यंत AB जोडू शकलो नाही. म्हणून माझी उमेदवारी अपक्ष म्हणून ग्राह्य धरली गेली. मीडियाच्या माध्यमातून अपक्ष असल्याचं दाखवलं जात आहे ते चुकीचं आहे. आता अर्धसत्य आहे, सत्य योग्य वेळ आल्यावर सांगेल तेव्हा लोक चकीत होतील. वेळ आल्यावर आम्ही या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचे तांबे म्हणाले.