Nashik News : एकीकडे नाशिकची (Nashik) गोदामाई म्हणून ओळख जाणाऱ्या गोदावरीचा (Godavari) दरवर्षी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली गोदामाईला सोडवण्यासाठीचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसून येत आहेत. ज्या दिवशी गोदामाई प्रदूषण मुक्त होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने गोदेचा उत्सव साजरा होईल, अशी आशा नाशिककर व्यक्त करत आहेत.
दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी ही नाशिककरांची जीवनवाहिनी होय. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना कुशीत घेणारी, जीव लावणारी, नाशिककरांना हवे नको ते बघणारी गोदावरी आज मरणासन्न अवस्थेत आहे. गोदावरीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहराजवळील ब्रह्मगिरी पर्वतावर (Bramhagiri Parvat) झाल्याचे सांगितले जाते. तेथून निघाल्यानंतर ती त्र्यंबक शहरातून वाहत गंगापूर, सोमेश्वरमार्गे नाशिक शहरात प्रवेश करते. याच गोदावरीचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जवळपास दहा बारा दिवस कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र दुसरीकडे गोदावरीचा प्रदूषण मुक्तीचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात आहे. नाशिक शहरात प्रवेश केल्यापासून ते पुढे वीस ते तीस किलोमीटर अंतरावर अनेक गटारी, मलनिस्सारण लाईन्स नदीत सोडण्यात आल्या आहेत. यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. वेळोवेळी पाहणी करण्यात आली. संबंधितांना नोटिसही बजावण्यात आल्या. मात्र परिस्थिती आजही जैसे थे आहे. नाशिकच्या पंचक भागात अनेक ठिकाणी तर फेसाळयुक्त पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोदावरी नदीला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे.
एकीकडे देशभरातील नागरिक पूजा विधीसाठी नाशिक शहरात दाखल होतात. गोदेच्या काठी वसलेल्या नाशिक शहरावर कौतुकाचा वर्षाव करतात. मात्र दुसरीकडे ज्या रामकुंडावर अनेक पूजा विधी, धार्मिक विधी होतात, त्याच गोदावरी नदीची अवस्था पाहून पर्यटक देखील नाक मुरडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत गोदावरी नदी पात्रात सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठावरील अनेक पुरातन वास्तू तोडण्यात आल्या आहेत. यामुळे पुरातन मंदिरांना धोका निर्माण झाला असून काही पुरातन पायऱ्या देखील उद्ध्वस्त करण्यात येऊन नव्या पायऱ्या बसवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गोदावरीचे विलोभनीय रूप कुठेतरी लोप पावत चालले आहे.
मलनिस्सारण योजनेसाठी 325 कोटींचा प्रस्ताव
गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सुकाणू समिती आणि केंद्रीय शिखर समितीने पालिकेच्या मलनिस्सरण योजनेच्या 325 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. त्यानंतर हा प्रकल्प अहवालकरता आणि सल्लागार नियुक्ती तसेच योजनेच्या प्रशासकीय मंजुरीसाठी हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर सादर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत दोन या योजनेअंतर्गत निधी प्राप्त होणार असून, त्यातून नाशिक शहरातील तपोवन आणि आगरटाकळी येथील मलनिस्सरण केंद्रांचे आधुनिकीकरण आणि क्षमता वाढ होणार आहे.