Nashik News : राज्याच्या राजकारणाला (Maharashtra Politics) वैतागून दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातील एका नागरिकाने राष्ट्रपतींना (President) पक्षांतर बंदी कायद्यांत सुधारणा करण्याबाबत पत्र लिहिले होते. हे पत्र चांगलेच व्हायरल झाल्यानंतर आता ओझरच्या एका नागरिकाने चक्क निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदार यादीतून नाव वगळण्यात यावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) सध्याला चांगलंच चर्चेत असल्याचे दिसते आहे. 


महाराष्ट्रातील राजकारणाला (Maharashtra Politics) सर्वसामान्य नागरिक वैतागले असून गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहून नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यावरून सर्वसामान्य नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. अनेक नागरिकांकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. तिकडे नेत्यांकडून एकामागोमाग पक्ष बदलाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे आमच्या मतांना काही किंमत आहे का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. ओझर (Ojhar) येथील नागरिक मनोज उर्फ सुरेश कावळे यांनी सध्याच्या राजकीय व्यवस्थेचा उबग आल्याने मतदार यादीतूनच नाव वगळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. 


मनोज काळे लिहितात की, राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) पत्र देत आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात यावे अशी विनंती केली आहे. 1998 पासून लोकशाहीने दिलेल्या हक्काने आजपर्यंत लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या विविध निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावित आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकिय परिस्थिती आणि एकूणच सत्तेसाठी होत असलेली विविध राजकीय पक्षांची तत्वहिन व विचारहीन युती, आघाडी हे पाहून मन विषण्ण होत आहे. राजकारणाचा एकूणच होत चाललेला चिखल आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरु असून हे सगळं बघू शकत नाही. किंबहुना भविष्यात याहीपेक्षा विदारक स्थिती भारतीय लोकशाहीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्वच प्रक्रियेला व्यक्तीशः माझा हातभार लागू नये, अशी इच्छा असल्याने मतदार यादीतून नाव वगळण्यात यावे, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य व नाशिक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना देखील पत्राची प्रत पाठवली आहे. 


राष्ट्रपतींना पत्र 


नाशिकच्या सातपूर येथील रहिवाशी असलेल्या हर्षलकुमार गांगुर्डे थेट राष्ट्रपतींना पत्र लिहले आहे. या पत्रात गांगुर्डे लिहितात की, गेल्या काही वर्षांपासून भारत देशामध्ये राजकीय आमदार व खासदार यांनी स्वतःच्या सोयीसाठी पक्ष बदल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याच्यामागे काही कारण असतील, परंतु एका पक्षातल्या आमदार खासदार दुसऱ्या पक्षात जाऊन सरकार पाडण्याची किंवा स्थिर करण्याचे काम आज-काल वारंवार होत आहे. मागच्या काही दिवसात वेगवेगळ्या राज्यात मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा ठिकाणी या घटना पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा कडक करावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. 


ही बातमी वाचा: