Nashik Ganeshotsav : मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयामार्फत (Mumbai) ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या विषयावर घरगुती देखावा व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी (Ganeshotsav) गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धेचे (Ganesh Decoration Competation) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी. (Nashik Collector) यांनी केले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी (State Election Officer) कार्यालयामार्फत मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी दरवर्षी ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या विषयासंबंधी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. हे या स्पर्धेचे दूसरे वर्ष असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिरित्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सदर स्पर्धेची सविस्तर नियमावली या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर देण्यात आलेली आहे. गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट, 2022 ते 9 सप्टेंबर, 2022 या कालावधीत https://forms.gle/6jhfuUA4YSRZ6AU7 या संकेतस्थळावरील उपलब्ध अर्जावरील माहिती भरून आपल्या देखावा सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही हिरिरीने जपतो आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेश देखील दिले जातात. याच धर्तीवर 'माझा गणेशोत्सव माझा मताधिकार' या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफीत हे साहित्य पाठवायचे आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या चार अर्हता तारखा यांसाठीची प्रसार-प्रचार करणे आवश्यक आहे.
अशी करावी सजावट
मताधिकार हा 18 वर्षांवरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून सजावट करावी. तसेच मंडळांनी देखाव्यांच्या माध्यमातून, तर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावट करून दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवावी. तसेच मताधिकार बजावतांना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखावा व सजावटीतून जनजागृती करावी.