नाशिकच्या दिंडोरीत शेतमजुराचा हातोडी मारून खून, पोलिसांची डोकेदुखी वाढली
Nashik Crime : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील एकाचा डोक्यात हातोडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अनिल झेंडफळे असे या तरुणाचे नाव आहे.
नाशिक शहरात खुनाच्या घटना समोर येत असताना आता जिल्ह्यातही गुन्हेगारी वाढत चालल्याचे चित्र आहे. पिंपळगाव बसवंत येथील अनिल झेंडफळे या तरुणाचा मृतदेह दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील रासेगाव ते देहरेवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आढळून आला आहे. या तरुणाच्या डोक्यात हातोडी मारून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान हि घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. या ठिकाणी पिंपळगाव बसवंत येथील देवीचा बरड परिसरात राहणारे अनिल राजाराम झेंडफळे यांचा मृतदेह रासेगाव ते देहरेवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला आढळून आला. तर घटनस्थळावरून काही अंतरावर लोखंडी हातोडी देखील आढळून आली. या घटनेची माहिती दिंडोरी पोलिसांना मिळताच दिंडोरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. अज्ञात संशयिताने पिंपळगाव बसवंत येथील अनिल झेंडफळे यास देहरेवाडी शिवारात आणून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोडीने मारून त्यास जीवे ठार मारले.
तसेच खून केल्यांनतर मृतदेह रस्त्याच्या कडेला आणून संशयिताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र येथून जाणाऱ्या पदाचार्यां मृतदेह निदर्शनास आल्यानंतर याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. सदर तरुणाचा खून झाला असला तरी मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शिवाय संशयितांबाबत कुठलीही माहिती अद्याप पोलिसांना नाही. या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून पोलिसांपुढे संशयिताला शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड तसेच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे अधिक तपास करत आहेत.
नाशिक बनतेय क्राईम कॅपिटल
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मागील पंधरा दिवसांत सात खून झाले असून दिंडोरी तालुक्यातील या खुनाने हि संख्या आठवर गेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागात देखील दहशतीचे वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीने नाशिक शहराची ओळख क्राईम कॅपिटल म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.