MP Hemant Godse : नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघाचे सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी शिवसेनेकडून (Shivsena) मिळूनही खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत असली तरी, अडीच वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीचा भाग म्हणून गोडसे यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा आणि त्या माध्यमातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची खेळी खेळल्याचे मानलं जाते आहे. नाशिकमधून दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार हेमंत गोडसेंचा आढावा घेऊया..
नाशिकच्या देवळाली परिसरातील (Deolali Camp) संसरी गावात खासदार हेमंत गोडसे यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द ही मनसेपासून सुरु झाली. 2009 मध्ये राज्यात राज ठाकरे यांच्या मनसेची हवा निर्माण झालेली असताना गोडसे यांनी मनसेत प्रवेश करून जि.प.ची निवडणूक लढविली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून 2007 ते 2012 या काळात नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच, 2008 ते 2009 या कालावधीत ते पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्यदेखील होते. पुढे 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवित त्यांनी शहराच्या राजकारणात प्रवेश केला.
तत्पूर्वी, 2009 च्या निवडणुकीतही त्यांनी 'मनसे'तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला. राज ठाकरे यांच्या प्रभावी भाषणांमुळे गोडसे यांना भरभरून मते मिळाली होती. त्यानंतर 2014 मध्ये गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना खासदारकी लढविण्याची संधी दिली. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उमेदवार होते. मात्र, मोदी लाटेमुळे भुजबळ यांचा पराभव करीत गोडसे 'जायंट किलर' ठरले. तर सप्टेंबर 2014 नंतर ते केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीत सदस्य म्हणून कार्यरत होते. हवाई उडाण योजनेंतर्गत नाशिक देशातील नऊ शहरांशी जोडले जाण्यासाठी गोडसे यांनी प्रयत्न केले.
रेल्वे व्हील दुरुस्ती कारखाना आणि इलेक्ट्रिकल लॅबचे भूमिपूजन करून त्यांनी नाशिकमधील मतदारांना आपण विकासाप्रती गंभीर असल्याचे दाखवून दिले. नाशिक मतदारसंघात खासदाराची पुनरावृत्ती होत नाही, असा इतिहास असतानाही शिवसेनेने गोडसे यांच्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे ते पुन्हा उमेदवार झाले आणि आता ते निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी नाशिकमध्ये इतिहास घडविला आहे. त्यांनी भुजबळांचे पुतणे समीर यांना शह दिला आहे. त्यामुळे भुजबळ काका-पुतण्याला पराभूत करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर झाला आहे. दरम्यान सेनेची राज्यात असलेली ताकद पाहून आजवर त्यांनी सेनेचा आश्रय घेतला.
आता शिंदे गटात प्रवेश
दरम्यान गेल्या महिनाभरापासून राज्यात राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर नुकताच शिवसनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटात दाखल झाले. यामध्ये हेमंत गोडसे यांनी देखील हिंदुत्वाचे नाव पुढे करून शिंदे गटाची वाट धरली. वरकरणी गोडसे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली असली तरी, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून पुन्हा उमेदवारीची व विजयाची खात्री वाटत नसल्यामुळेच गोडसे यांनी वेगळी वाट चोखाळल्याचे बोलले जात आहे.