Nashik Crime : खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांचे पुत्र अजिंक्य गोडसे आणि योगेश ताजनपुरे यांनी इमारतीच्या बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता वृक्षांची अवैध कत्तल केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासोबतच चार लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
एकीकडे 'स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक' (Nashik) अशी आवई उठवली असताना अनेकदा विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या विरुद्ध सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवत मनपा प्रशासनाला धारेवर धरले आहे. आता मात्र थेट खासदार पुत्र असलेल्या अजिंक्य गोडसे यांच्यासह त्यांचे मित्र असलेले योगेश ताजनपुरे यांनी एका इमारतीच्या बांधकामासाठी वृक्षांची तोड केली आहे. हा प्रकार स्थानिकांनी महापालिकेच्या लक्षात आणून दिल्यानंतर महापालिकेनेही गोडसे ताजनपुरे यांना चार लाख वीस हजारांचा दंड केला आहे.
नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक 19 मधील देवळाली शिवारातील न्यू बालाजी हॉटेल शेजारी असलेल्या खर्जुळ मळ्यातील जागेत अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे येथील वृक्षांनी बहरलेला असतो. मात्र अलीकडे खासदार गोडसे यांच्या पुत्र अजिंक्य गोडसे यांनी मित्र असलेल्या ताजनपुरे यांनी याठिकाणी इमारत उभी करण्यासाठी पालिकेची परवानगी न घेताच सात वृक्षांची तोड केली आहे. यावरून परकरां गंभीर बनले आहे. स्थानिकांनी याबाबत आवाज उठवत नाशिक महापालिकेला माहिती दिली. तसेच तक्रारही केली.
यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने तातडीने येथील वृक्षतोड थांबवून ट्रकसह साहित्य जप्त केले आहे. तसेच गोडसे आणि ताजनपुरे यांना अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी चार लाख वीस हजारांचा दंड ठोठावला आहे. यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले आहे. घटनास्थळावरील साहित्य नाशिकरोड पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती मनपा उद्यान उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली आहे.
वृक्षतोडीचा नियम काय सांगतो...
नागरी क्षेत्रात कोणत्याही मिळकती मधील झाडांचे संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र झाडांचे जतन अधिनियम कायदा 175 नुसार व सुधारणा अधिनियम 2019 पारित केला आहे त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीशिवाय वृक्षतोड अवैध मानले जाते. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीशिवाय वृक्षतोड अवैध मानली जात असून अवैध वृक्षतोड केल्यास दंडासह पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.