Nashik Sanjay Raut : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची सभा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून शिवसेनेचे (Shivsena) प्रमुख नेते मालेगावमध्ये येणार आहेत. मालेगावमधून (Malegaon) उद्या जो संदेश जाईल, तो राज्यात आणि देशात जाईल. महत्वाचे म्हणजे मालेगावमधून आगामी आमदार म्हणून अद्वय हिरे असतील असा सूतोवाच खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्या उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत (sanjay Raut) हे मालेगावमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने ते दुसऱ्यांदा पाहणीसाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मालेगावमध्ये येणार आहे. या सभेची उत्सुकता फक्त मालेगावमध्ये नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. गद्दारी प्रकरण घडल्यानंतर या भागात उद्रेक आहे. उद्धव ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. लाखोंच्या संख्येने नागरिक सभेला येतील. उद्या संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे येणार आहेत. शिवसेनेनेच प्रमुख नेते मालेगाव मध्ये येणार आहेत. मालेगावमधून उद्या जो संदेश जाईल, तो राज्यात आणि देशात जाईल, असेही ते म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाला अजिबात स्थान द्यायचे नाही, विरोधी पक्ष नष्ट करण्याचे काम सुरू आहे. आम्हाला खोके आणि मिंधेवाले का म्हणतात? हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. तुम्ही जी बेईमानी केली आहे. त्यामुळे तुमच्यावर लोकांचा राग असून तुम्ही निवडणुकीला सामोरे जा म्हणजे खरे आणि खोटे कोण आहेत हे समजेल. आमच्यावर कोणी किती टीका केली तरी आमचे सावरकर प्रेम कमी होणार नाही. सावरकर यांच्याबद्दल शिवसेना कोणताही अपमान सहन केला जाणार नाही. तसेच मिंधे गटापुढे आम्ही गुडघे टेकवले नाही, म्हणून आम्ही जेलमध्ये गेलो. राहुल गांधी देखील झुकले नाही, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
मालेगावात उर्दूत सभेची बॅनरबाजी....
तसेच हा देश सगळ्यांचा असून या देशात सगळे जाती धर्माचे लोकांना स्थान आहे. त्यामुळे उद्याच्या सभेला मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात येणार आहेत. जनाब म्हणले, तर काय झाले? या देशात उर्दूवर बंदी आली आहे का? या देशात अनेक कवी आणि साहित्यिक उर्दूमध्ये लिहितात. उर्दूमध्ये मालेगावमध्ये बोर्डिंग लावल्यावर काय बिघडले? मालेगावमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले, पण ते पळून गेले. मालेगावचे पुढचे आमदार अद्वय हिरे असणार आहेत. राज ठाकरे, नारायण राणे आणि इतर सर्व नेतेच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे असतात. त्यामुळे ते मोठे नेते आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढून काही आमदार निवडून आणून दाखवावे. हे सर्व नेते फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात. म्हणजे उद्धव ठाकरे यांची त्यांना भीती वाटते. या चोर मंडळीला घालवण्यासाठी मालेगावमधून सुरवात असल्याचा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.