Nashik Narhari Zirwal : आपल्या साध्या पेहराव आणि साध्या बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. झिरवाळ हे नुकतेच जपानच्या (Japan) दौऱ्यावर पत्नीसह गेले होते. जपान दौऱ्याहून परतलेले झिरवाळ यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जपान दौऱ्यातील कथन केलेला अनुभव चांगलाच गाजत आहे. यातील स्वेटर खरेदीचा किस्सा चांगलाच चर्चेत आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे 11 ते 23 एप्रिल या कालावधीत जपान देशामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचा (Member of Maharashtra Legislature) दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यासाठी झिरवाळ पत्नीसह गेले होते. जपानचा दौरा कसा झाला याबाबत आमदार नरहरी झिरवाळ यांनी अनेक आठवणी सांगितल्या. सदरा, धोतर आणि पांढरी टोपी यावरच जपानमध्ये ते फिरले. पहिले दोन दिवसतर पैसे खर्च करावेत कसे हाच प्रश्न होता. यावेळी ते पत्नीसह स्वेटर खरेदीसाठी दुकानात गेले असताना इथल्या स्वेटरची किंमत पाहून झिरवाळ यांच्या पत्नी चकित झाल्या. त्या म्हणाल्या की, स्वेटर खरेदी जपानमध्ये नाहीतर नाशिकमध्ये (Nashik) करु असे सांगत स्वेटरच्या दुकानातून काढता पाय घेतला.
दरम्यान जपानच्या दौऱ्यावर गेलेले नरहरी झिरवाळ यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, आम्ही ज्या परिसरात राहत होतो, त्या ठिकाणी थंडी असल्याने सहकाऱ्यांनी स्वेटर घेण्याचा आग्रह केला. ताईंनाही स्वेटर घ्या असे आमच्यासोबत असलेल्या महिला प्रतिनिधी, गाईडस् यांनीही आग्रह धरला. जपानमध्ये पत्नीला स्वेटर घेण्यासाठी एका दुकानावर गेलो. त्याला स्वेटरची किंमत विचारली तर त्याने 28 हजार इतकी सांगितली. स्वेटरची किंमत ऐकून पत्नीने लगेच नकार दिला. इतक्या पैशांत तर घरातील सर्वांना स्वेटर घेऊनही पैसे उरतील. आपल्या नाशिकला तर 1200 रुपयात स्वेटर मिळतो, असे ती म्हणाली आणि आम्ही दुकानातून काहीच न घेता बाहेर पडलो.
ते पुढे म्हणाले की, मी कधीच स्वेटर घालत नाही. त्यामुळे पत्नीसाठी स्वेटर घेण्यासाठी गेलो. सुरुवातीला ती नाहीच म्हणाली, पण काहीतरी घ्यायचे म्हणून एका दुकानात गेलो आणि स्वेटरची किंमत विचारली. त्याने 28 हजार इतकी किंमत सांगितली. किंमत ऐकूनच पत्नीने इतका महागडा स्वेटर नको, असे सांगितले, इतक्या पैशात अख्या घरादाराला स्वेटर येतील आणि पैसेही उरतील, असे ती म्हणाली, असा किस्सा झिरवाळ यांनी सांगितला. आता किमती विचारायच्या नाही, थेट खरेदी करायची असे ठरवून मी पत्नीला वस्तू खरेदीसाठी आग्रह धरला. मात्र ती काही केल्या तयार होईना. शेवटी नातवंडासाठी काही खेळणी घेतली आणि भारतात परतल्याचे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
जपानची बुलेट ट्रेन आणि चकचकीत गाडी....
जपानमध्ये प्रदूषण, धूळ नसल्याने तेथील गाड्याही एकदम चकचकीत होत्या. प्रत्येक चारचाकी गाडी अशी होती की जणू आताच शोरुममधून आणली आहे. चाकाचे डिस्क इतके स्वच्छ की त्यामध्ये चेहरा पाहून तुम्ही केस विंचरु शकतात. चारचाकीच नव्हे तर दुचाकी देखील अतिशय स्वच्छ दिसल्या. जपानमध्ये जे आहे ते आपल्याकडे देखील आहे. परंतु आपणाकडे वापरण्याची पद्धत चुकीची आहे. जपानची बुलेट ट्रेन अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकी होती. या ट्रेनमधून प्रवास करताना गाडीची किती काळजी घेतली जाते आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते हेही जाणवले, असा अनुभव त्यांनी सांगितला. आपल्याकडील गाड्यांचे सीट कुठे तर कड्या कुणीकडे अशी परिस्थिती असते, तेथे तसे नाही.