Nashik Onion Issue : नाफेडमार्फत 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार असून यासाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी (Onion Issue) पत्र व्यवहार केला असल्याचे माहिती मंत्री डॉ.भारती पवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागच्या सरकारने केवळ 40 हजार मेट्रिक टन कांदा नाफेड मार्फत खरेदी केला होता. असे असताना आता अधिकच कांदा खरेदी करण्यात येत आहे. मात्र सद्यस्थितीत शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आताच आंदोलनाचे सुचते आहे काय? असा सवाल मंत्री डॉ. पवार यांनी उपस्थित केला आहे. 


आज मंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharati Pawar) या नाशिकच्या येवला येथे (Nashik) उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना नाफेडमार्फत कांदा खरेदी केला जाणार असल्याचे सांगितले. नाफेड (NAFED) मार्फत कांदा खरेदीसाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट घेत पत्रही दिले आहे..मागच्या वर्षी अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता.. नाफेड मार्फत कांदा खरेदीचे ॲलोकेशन झाले आहे..काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर लागत आहे. मात्र लवकरच नाफेड मार्फत 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. ही बातमी शेतकरी संघटनांना कळल्यानंतर ते आंदोलनाची भाषा करत राजकारण करू पाहत आहे. गेल्या 70 वर्षाच्या सरकारने किती कांदा खरेदी केला आणि आमच्या सरकारने किती कांदा खरेदी केली, याची माहिती घ्यावी, मग आंदोलनाची भाषा करावी, असा टोला शेतकरी संघटनेच्या नेत्यांना लगावला आहे. 


मंत्री पवार पुढे म्हणाल्या की, नरेंद्र मोदींचे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. शेतकऱ्यांसाठी नाफेड खाली स्पर्धेत उतरते. तरी देखील जर नुसतं राजकारण म्हणून आंदोलन करण्याची भूमिका असेल तर योग्य नाही. केंद्र सरकार, मोदींचे सरकार हे शेतकऱ्यांचा सरकार आहे. शेतकऱ्यांना समर्पित सरकार आहे आणि आज पर्यंत कुठल्या सरकारने गेल्या 70 वर्षात किती खरेदी केली? याचा हिशोब द्यावा आणि मग आंदोलन करावी आणि मग प्रश्न विचारावे. असा सवाल करत भाजप सरकार हे शेतकऱ्यांना समर्पित सरकार असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.


मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा 


कांदा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशभरातील साधारण 30.03 टक्के वाटा असलेल्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक कांदा उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. चालू हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले परंतू अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्‍यांसाठी मागील हंगामातील लाल कांदा नाफेड मार्फत खरेदी केल्याने केंद्रीय मंत्री गोयल यांचे आभार मानले असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.