Amravati Ridhpaur : नाशिकच्या (Nashik) महानुभाव संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रिद्धपुर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Bhasha University) स्थापन केले जाणार अशी घोषणा केली आहे. त्यानुसार अमरावती (Amravati) जिल्ह्यातील महानुभावपंथीयांची काशी श्रीक्षेत्र रिद्धपूरमध्ये (Ridhpur) हे विद्यापीठ साकारण्यात येणार असल्याने प्रथमच राज्यात मराठी भाषा विद्यापीठ असणार आहे. 


नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात त्यांनी रिद्धपुर येथे मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा केली. दरम्यान रिद्धपुर हे अमरावती जिल्ह्यात असून श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभावपंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी म्हणून ओळखली जाते. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले.त्याचप्रमाणे सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहले गेल्याने या भूमीला विशेष महत्व आहे. 


रिद्धपुर हे श्री गोविंदप्रभू, चक्रधर स्वामी, श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांनी वास्तव्य केलेली भूमी आहे. माहीम भट्ट, केशीराज व्यास, महदाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांनी याच ठिकाणी मराठी भाषेला झळाळी दिली. समतेचा विचार 13 व्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंदप्रभुंनी मांडला. चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता, स्त्री दास्य, मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या. आचारधर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना रिद्धपुरमध्ये केल्याचे अनुयायी सांगतात.


विद्यापीठ निश्चित उभं राहील!
दरम्यान आजच्या महानुभाव संमेलनात देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यात रिद्धपुर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा केली. मागील काळात आमचे सरकार असताना आम्ही रिद्धपुर विकासासाठी 298 कोटींचा प्रस्ताव करण्यात आला होता, मात्र तो बारगळला. मात्र  आता आपले महानुभाव पंथांचे सरकार असून रिद्धपुर येथे मराठी भाषा विद्यापिठ उभारण्यात येईल. लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर मागील काळात रिद्धपूरच्या विकासासाठी आरखडा तयार करून अहवाल तयार केला होता. मात्र नंतरच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र आता महानुभाव पंथांच्या आशीर्वादाने आलेले सरकार रिद्धपुर येथील विद्यापीठ साकारेल यात शंका नाही, असे आश्वासन यावेळी फडणविस यांनी दिले. 


लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग 
लीळाचरित्र आद्यग्रंथ मराठी भाषेतच नव्हे, तर मराठीच्या वऱ्हाडी बोलीत लिहून घेतले. श्री चक्रधरांनी याच गावात वाङ्मयीन, आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक क्रांती केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याचा पहिला प्रयत्न याच भूमित झाला. महानुभावांच्या 14 सांकेतिक लिपी ही फार मोठी भाषा वैज्ञानिक व लिपीशास्त्राची क्रांती समजली जाते. लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग केला. भाष्कर भट्ट, बोरीकर, नरेंद्र पंडित, विश्वनाथ पंडित, दामोधर पंडित, काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी या पंथात कथा काव्य निर्माण केलेत. कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, शास्त्रीय ग्रंथ, व्याकरण, भाषा विज्ञान, लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वाङ्मय निर्मिती यात झाली. तत्त्वज्ञानाची मराठीतून शास्त्रशुद्ध मांडणी करून कर्मकांड व प्रवृत्तीवादाला नकार दिला व संन्यासवादाचा पुरस्कार केला.