Nashik TET Scam :  नोकरीसाठी मालेगाव (Malegaon) तालुक्यातील महिलेने टीईटीचे बनावट प्रमाणपत्र (TET Fraud Certificate) देऊन शासनाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी पोलिस ठाण्यात (Nashik Police) तक्रार दिली आहे. तब्बल दोन वर्षानंतर संबंधित महिला शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


राज्यात टीईटी घोटाळा (Maharashtra TET Scam) गाजला असताना नाशिकमध्येही (Nashik) महिलेने शिक्षिकेच्या नोकरीसाठी (Teacher) बनावट टीईटी प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली आहे. शिक्षण विभागाच्या पडताळणीत ही बाब उघड झाली आहे. मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे पाडा येथील महिला शिक्षिका तेजल रवींद्र ठाकरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजल ठाकरे (Tejal Thackeray) यांनी शिक्षकाच्या नोकरीसाठी 1 जून 2017 रोजी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नोकरीसाठी टीईटीचे बनावट प्रमाणपत्र दिले होते. 


परंतु त्यानंतर 2018 मध्ये राज्यात टीईटी परीक्षेतील महाघोटाळा उघड झाल्याने शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी होत होती. याचवेळी मालेगाव तालुक्यात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या तेजल ठाकरे यांचेही कागदपत्र तपासणीसाठी आले होते.  तपासा दरम्यान टीईटी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे राज्यात 2018 पूर्वी ही टीईटीच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक बाब या प्रकरणातून समोर आली आहे.


शिक्षणाधिकारी फुलारी म्हणाले की तेजल रवींद्र ठाकरे या महिलेने शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्याकरता शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक येथे बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्यानेच तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान राज्य परीक्षा परिषदेने 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांकडे संबंधित महिलेचे प्रमाणपत्र बोगस असल्याने कारवाई करून अहवाल पाठवण्याच्या आदेश दिले होते मात्र त्या आदेशांची अंमलबजावणी होऊन गुन्हा दाखल होण्यास दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे कारवाईला इतका उशीर का लागला अशीही चर्चा शिक्षण विभागात रंगू लागली आहे.


बनावट प्रमाणपत्रांचा टीईटी घोटाळा...


शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे तात्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे तसेच परीक्षा घेणाऱ्या जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार यांच्यासह राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे, शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरकर, संजय शाहूराव सानप यांना अटक करण्यात आली होती. ही परीक्षा घेण्याची जबाबदारी बंगळुरू येथील जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीकडे सोपवण्यात आली होती, मात्र हा घोटाळा राज्यभरात गाजला होता.