Jitendra Awhad : छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्या एका पोस्टनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर काळाराम मंदिर प्रशासनाने देखील स्पष्टीकरण दिले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. शनिवारी ते काळाराम मंदिरात प्रवेश करत संविधानाची प्रत ठेवणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियातून माहिती दिलीय. 


संयोगिताराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर पुजाऱ्यांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्यास नकार दिल्याने देखील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे वेदोक्त प्रकरण चांगलंच गाजत आहे. अशातच  जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत या प्रकारावर सडकून टीका केली आहे. तसेच छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "मी धर्मअभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने वसुधैव कुटूंबकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. संयोगिताराजे यांच्याबद्दल वाईट घडलं. या लोकांनी पुरोणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे, त्या छत्रपती शाहू महाराजांना देखील अशीच वाईट वागणूक दिली होती. या देशाच्या घटनेवर, बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी तीन वाजता यावे. आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात"


 






संयोगीताराजे छत्रपती यांची पोस्ट काय आहे? 


संयोगीताराजे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मंदिरात महामृत्युंजय मंत्र म्हटलं, रामरक्षा पठण केले. मात्र यावेळी मंदिरातील महंतांनी पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हटले. शाहू महाराजांनी कर्मकांडाला विरोध केल्याने आणि आपण त्या घराण्याचा वारसा चालवत असल्याने त्यास विरोध केला. यावेळी मात्र महंतांनी तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले. मात्र यास न जुमानता मी महामृत्युंजय मंत्र, रामरक्षा पठण केले. त्यावेळी त्यांना सांगितले, ज्या मंदिरात आपण आजच्या काळातही नियम लावत आहात, ती मंदिरे वाचवली कोणी? छत्रपतीनी वाचवली! मग छत्रपतींना शिवकण्याचे धाडस करू नका, अशा आशयाची पोस्ट संयोगीताराजे छत्रपती यांनी केली आहे. 


मंदिर प्रशासनाने काय म्हटलंय?


महंत सुधीरदास यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, संयोगीताराजे यांनी 24 तासांपूर्वीची पोस्ट असली तरी मात्र त्या जवळपास पावणेदोन महिने झाले, त्यावेळी नाशिकला आल्या होत्या. यावेळी त्यांनी काळाराम मंदिरात महामृत्युंजय, रामरक्षा पठण केलं, काळाराम मंदिरातील पुजारी किंवा कुणीही त्यांना त्यापासून रोखलं नाही. आमच्यासाठी छत्रपती घराणे हे आदरणीय असून अशा घटनांवेळी ब्राम्हण आणि पुजारी हे सॉफ्ट टार्गेट केले जातात. जर संयोगीताराजे यांचा अपमान झालेला वाटत असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे महंत सुधीरदास यांनी सांगितले.


ही बातमी वाचा: