Majha Katta Long March : जनतेत असंतोष होता, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली, महिलांना रोजगार नाही, अंगणवाडी सेविका कमी पगारात काम करत आहेत या सगळ्यातून लाँग मार्च उभा राहिला. सद्यस्थितीत सरकारने आमच्या मागणी मान्य केल्या असल्या तरीही या मागण्याची अंमलबाजवणी झाली नाही तर हे थांबलेलं लाल वादळ नव्या उभारीने पेटून उठेल, आणि पुढचा लाँग मार्च तीव्र असेल असा इशारा माजी आमदार जे पी गावित यांनी माझा कट्ट्यावर दिला. 


नुकत्याच झालेल्या किसान सभेच्या लाँग मार्चच्या (Nashik Long March) पाश्वर्वभूमीवर डॉ. डी. एल. कराड, जे पी गावित, अजित नवले (Ajit Nawale) आणि मोर्चातील काही महिलांसोबत माझा कट्ट्यावर (Majha Katta) संवाद साधला. यावेळी शेतकरी नेत्यांनी आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही काय आग्रही असू अशी भूमिका मांडली. यावेळी विशेषतः माझा कट्ट्यावर सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी यातील सहभागी महिला म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांना साधारण महिन्याला आठ हजार रुपये पगार मिळतो, मात्र या आठ हजारमध्ये कुटुंबीयांचं काहीच भागत नाही. आजच्या महागाईच्या मानाने आम्हाला 20 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही अंगणवाडी सेविकांनी विचार केला की आपण देखील मोर्चात सहभागी व्हायचं. जे होईल ते पाहू पण मोर्चा सहभागी होऊ असा निर्धार करत आम्ही जे पी गावीत त्यांना भेटलो. आणि मोर्चा सहभागी होण्याचं सांगितलं. 


तर माझा कट्ट्यावर उपस्थित दुसऱ्या महिला म्हणाल्या की, सुरगाणा तालुक्यात (Surgana) जे पी गावित (J P Gavit) यांना देव म्हणून ओळखले जातं. कुठलेही काम असो लोक त्यांच्याकडे धाव घेतात. म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे जायचं निर्णय घेतला. मात्र अंगणवाडी सेविकांचे पगार काही वाढत नाही. या दृष्टीकोनातून आम्ही थेट जेपी गावीत त्यांच्याकडे गेलो. जोपर्यंत आमच्या तालुक्यात जे पी गावित यांच्यासारखे क्रांतिवीर आहेत. तोपर्यंत आमचे प्रश्न हे अशाच मार्गाने सोडवले जातील. शेतकऱ्यांचे अश्रू नित्याचे झाले असून वेळोवेळी आंदोलन करावे लागत आहे, आंदोलना शिवाय काही होऊ शकत नाही का? प्रत्येक वेळी आंदोलन करून मिळवावं लागत आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत, पण आमच्यापर्यंत पोहचत नाहीत, अंगणवाडीत काम करत असतांना दुसरं काही करता येत नाही, मग घर कसं चालवायचं, असा प्रश्न पडतो. म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचे महिलेने सांगितले. 


डॉ. डी एल कराड म्हणाले ....


यावेळी डॉ. डी एल कराड म्हणाले की, मोर्चानंतर त्यांचे अश्रू पुसले जातात का नाही हे सांगता येणार नाही. परंतु किती वेळा आंदोलन करावं लागेल हे सांगता येणं अवघड आहे. एखादी जमीन नावावर झाली. शेतीला पाण्याची सोय झाली. त्यामुळे मुलं शिकू शकली, कुटुंब चालू शकले. त्यांचा जर विकास झाला तर आंदोलन कमी होतील. 2018 मध्ये ज्यावेळी हा मोर्चा निघाला. त्यावेळी विधानभवनामध्ये या सर्व प्रश्नांवर चर्चा झाली की आता हे प्रश्न सुटणार आहेत. मात्र आमच्या मनात होता, आम्हाला माहित होतं की, या आंदोलनातून सर्व प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. याची आम्हाला जाणीव होती. सद्यस्थितीत लोकांच्या अडचणी समजून घेणे. त्यांना संघटित करणं आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करून ते अडचणींवर मात करणे हा एकमेव पर्याय असल्याचे डी एल कराड म्हणाले.


माजी आमदार जे पी गावित म्हणाले...


तर माजी आमदार जे पी गावित म्हणाले की, जनतेच्या असंतोषातून हे आंदोलन उभे राहिलं. या आंदोलनाची तयारी काही महिनाभरापासून सुरू होती असं नाही. तर कांद्याचे पडलेले भाव, शेतजमिनींबाबत वनविभागाकडून होणारी शेतकऱ्यांची हेळसांड, विविध योजना गावापर्यंत न पोहोचणे, पाणीटंचाई घरकुल योजना अपहार या सगळ्या गोष्टींमुळे हे आंदोलन तात्काळ उभा राहिलं आणि मुंबईवर चालून आलं. विधानभवनात सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यान आम्ही येण्याचे ठरविले त्यानुसार नियोजन झाले. सद्यस्थितीत सरकारने आमच्या काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी अंमलबजावणी न झाल्यास आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी माजी आमदार जेपी गावित यांनी दिला.