Nashik PM Kisan : पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) माध्यमातून शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपयांचे (PM Kisan Fund) अनुदान दिले जाते. राज्यासह देशभरातील शेतकरी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेत आहेत. मात्र सिन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा कटू अनुभव आल्याचे समोर आले आहे. एका 67 वर्षीय शेतकऱ्याला पीएम किसान पोर्टलवर जिवंतपणीच मृत दाखवल्याने लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तालुक्यातील पीएम किसान योजनेचा लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यासोबत ही घटना घडली आहे. हा शेतकरी पंतप्रधान किसान योजना सुरु झाल्यापासून लाभार्थी आहेत. मात्र सद्यस्थितीत पीएम किसानच्या पोर्टलवर शेतकऱ्यास मृत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे लाभ मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. या गंभीर प्रकाराबाबत संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तथापि, दहा दिवसांनंतरही तहसीलदारांनी या गंभीर प्रकाराची साधी दखल घेतलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील शेतकरी सुभाष काळू गीते (Subhash Gite) यांच्या संदर्भात हा प्रकार घडला आहे. या शेतकऱ्यास 2019 मध्ये पीएम किसान योजनेंतर्गत दोन हफ्त्यांचा लाभ मिळाला होता. मात्र त्यानंतर अचानक योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. मात्र नंतरच्या काळात कोविडचे संकट आले. त्यामुळे कदाचित योजनेचा लाभ मिळाला नसेल, अशी शक्यता गिते यांनी गृहीत धरली. गेल्या काही महिन्यांत शासन स्तरावरून पुन्हा शेतकऱ्यांना केवायसीसाठी आवाहन करण्यात आले. त्यामुळे गिते यांनी केवायसी अपडेट करण्यासाठी वडांगळी महा ई-सेवा केंद्र गाठले. केंद्रचालकाने केवायसी अपडेट करण्यास घेतल्यानंतर त्याला आणि गिते यांनाही धक्का बसला. पोर्टलवर 'बेनिफिशयरी इज इनॅक्टिव्ह ड्यू टू डेथ' असा संदेश दाखवण्यात आला होता. म्हणजेच सदर शेतकरी हा मृत असून त्यामुळे पीएम किसान योजनेस आता पात्र नाही. 


जिवंतपणीच मयत घोषित.... 


दरम्यान असा संदेश पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली. यानंतर सुभाष गीते यांनी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या नावाने अर्ज लिहिला. घडलेला प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत पीएम किसान योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. मात्र आठ दिवसांनंतरही या अर्जावर काही होऊ शकले नाही. त्यामुळे गीते यांनी पुन्हा तहसीलचा उंबरा झिजवत सोमवारी अर्ज दाखल केला. मात्र, अद्यापही त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही, यावर सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी तर असा काही प्रकारच आपल्यापर्यंत आलेला नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत. त्यावरुन ढिम्म प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला असून, या प्रकाराने वडांगळी पंचक्रोशीत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


पीएम किसान योजनेचा गवगवा?


एकीकडे केंद्र आणि राज्य शासन पीएम किसान योजनेचा गवगवा करत असताना अशाप्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे. संबंधित शेतकऱ्यास दोन वर्षांपासून लाभच मिळाला नसल्याचे यावरुन दिसून येत आहे. सद्यस्थितीत गीते यांनी दुसऱ्यांदा सिन्नर तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला असून आता ते शासनाच्या लाभाची वाट पाहत आहेत. गीते यांच्या समयसूचकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र शहर , जिल्हा, राज्य देशात अनेक भागातील शेतकऱ्यांसोबत काही ना काही कारणास्तव लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी असतील. त्याचा शोध घेणे महत्वाचे आहे.